कटाईसाठी जनावरांची चोरी करणारे तीन चोरटे जेरबंद; एलसीबीची कारवाई, गुन्ह्यातील वाहन जप्त
By सुनील काकडे | Published: June 15, 2024 04:48 PM2024-06-15T16:48:44+5:302024-06-15T16:49:55+5:30
कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली.
सुनील काकडे, वाशिम : कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली. गुन्ह्यातील चार चाकी वाहनही पोलिसांकडून जप्त करण्यात आले, अशी माहिती १५ जून रोजी देण्यात आली.
जिल्ह्यात जनावरांची चोरी करणारे गुन्हेगार सक्रीय असून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी एलसीबीला दिले. यादरम्यान एम.एच. ३१ सी.एन. ७०६५ क्रमांकाच्या फोर्ड इन्डेवर वाहनातील मागच्या सीट काढून तथा वाहनास काळी फिल्म लावून जनावरांना कटाईसाठी कोंबून नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे एलसीबीच्या पथकाने अकोला जिल्ह्यातील महान येथे जावून आरोपिंचा शोध घेतला. याप्रकरणी अ. मतीन अ. नबी (३०), शे. अक्रम शे. मोहम्मद (२२) आणि शे. अलीम शे. महेमुद (४०) या तिघांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. वाहनात दोन गायी आणि एक वासरू कोंबून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांची सुटका करण्यात आली.
विविध ठिकाणाहून जनावरांच्या चोरीची कबुली अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची एलसीबीने कसून चाैकशी केली. संबंधितांनी जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, जउळका, शेलुबाजार, मंगरुळपीर आदी ठिकाणांहून जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली.