जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर अस्मिता योजनेचा वाशिममध्ये शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 05:39 PM2018-03-08T17:39:27+5:302018-03-08T17:39:27+5:30
वाशिम : ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्यासाठी राज्यशासनाने अस्मिता योजना अंमलात आणली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथे त्याचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला.
वाशिम : ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन’ देण्यासाठी राज्यशासनाने अस्मिता योजना अंमलात आणली. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून येथे त्याचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला. महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महिला बचतगटांच्या सदस्य व ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
‘अस्मिता’ योजनेमुळे तळागाळातील युवती व महिलांपर्यंत मासिक पाळीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होईल. तसेच या कारणामुळे शाळांमधील विद्यार्थीनींचे गैरहजर राहण्याचे प्रमाणही घटेल, या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या या योजनेच्या अंमलबजावणी जबाबदारी शासनाने महिला बचतगटांवर सोपविली आहे. यामाध्यमातून बाजारपेठेत तुलनेने महाग असलेली ‘सॅनिटरी नॅपकिन’ केवळ ५ रुपयांमध्ये गरजू युवती व महिलांना दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला बचतगटांनाही रोजगार मिळेल आणि महिला व मुलींच्या आरोग्याचा प्रश्नही निकाली निघेल, असा दुहेरी फायदा साध्य होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे एस.जी.कडेकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगट, युवती व ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती होती.