बंजारा विरासत ‘नंगारा’ म्युझियमचे लोकार्पण, पंतप्रधान मोदी यांनी वाजविला नगारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:35 AM2024-10-06T09:35:50+5:302024-10-06T09:37:01+5:30
संस्कृती दर्शविणारे पाच मजली नंगारा वस्तुसंग्रहालय
लोकमत न्यूज नेटवर्क, वाशिम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण झाले. पंतप्रधानांनी सकाळी विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचल्यानंतर जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजविला.
देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वस्तूसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तू संग्रहालयाचे भूमिपूजन झाले होते. दरम्यान, येथे उभे झालेले भव्यदिव्य नंगारा वस्तू संग्रहालय देशभरात लोकप्रिय होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
काँग्रेसने देशाला केवळ लुटण्याचे काम केले!
देशातील दलित, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या माघारलेल्या समाजाला काँग्रेसने कायम नजरेआड केले. काँग्रेसने देशाला आजवर केवळ लुटण्याचेच काम केले. कमजोर वर्ग, गरीब घटक अविकसित कसा राहील, याकडे काँग्रेसने विशेष लक्ष दिले. मात्र, भाजपने वंचित, गोरगरीब आणि उपेक्षित घटकांच्या प्रगतीला प्राधान्य दिले आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधानांनी केली. बंजारा भाषेतून भाषणाची सुरूवात पंतप्रधानांनी भाषणाची सुरूवात बंजारा भाषेतून केली. ‘पोहरादेवी को प्रणाम, जय सेवालाल, जय रामराव महाराज,’ असे म्हणत त्यांनी समाजाच्या गौरवशाली इतिहासावर भाष्य केले.
१८ वे अनुदान जमा
- पंतप्रधानांच्या हस्ते १६ हजार मेगावॅटच्या सौरऊर्जा उत्पादन परियोजनांतर्गत पाच सौर पार्कचे उद्घाटन झाले.
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ९५०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ व्या हप्त्याचे २० हजार कोटींचे अनुदान जमा करण्यात आले.
- नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत १९०० कोटी रुपयेदेखील शनिवारी देण्यात आले.
जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय
- १६ एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वास्तू कलेचा मेळ घालून उभारलेले नंगारा वस्तूसंग्रहालय पाच मजली आहे. त्यात १३ विविध गॅलरी असून येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन हाेत आहे.
- याशिवाय फ्लाईंग थिएटर, मुव्हिंग प्लॅटफॉर्म, रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येत आहे. १५० फूट उंच सेवाध्वज, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.
आता खऱ्या अर्थाने बंजारा काशी उभी झाली
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे भव्यदिव्य स्वरूपात नंगारा वस्तू संग्रहालय उभे झाले. बंजारा समाजाच्या समृद्ध आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या या संग्रहालयामुळे पोहरादेवीत आता खऱ्या अर्थाने बंजारा काशी उदयास आली. जगभरात मोदींचा प्रभाव वाढत असल्याचे सांगून ‘जलनेवाले जलते रहेंगे, हम ताकद से आगे बढेंगे, पुरे विश्व पर राज करेंगे,’ - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
विकासकामांची सेंच्युरी
संत डॉ. रामराव महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोहरादेवी येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी पोहरादेवीत येऊन नंगारा संग्रहालयाचे लोकार्पण केले. पोहरादेवीच्या विकासाला ७०० कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून, बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री