जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस; शेतकरी सुखावला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:28 AM2021-06-11T04:28:11+5:302021-06-11T04:28:11+5:30
मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटात वाशिम ...
मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटात वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामाला गती येण्याचा अंदाज शेतकऱ्यांमधून वर्तविला जात आहे. नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर येडशी फाट्यानजीक मरीमाता पुलावरून पूर गेल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक तासाभरासाठी वाहतूक खोळंबली होती. सध्या नव्याने पुलाचे काम सुरू होते. या पुलाची उंची आवश्यक त्याप्रमाणात न केल्याने ही समस्या कायमची निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १० जून रोजी रिसोड शहरात जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील लिंबाचे झाड दुपारी ३ वाजेच्या सुमारास उन्मळून पडले. या झाडाखाली रामकृष्ण तांबे यांचा रिक्षा दबल्यामुळे नुकसान झाले. मंगरूळपीर तहसील कार्यालय परिसरातही पाणी साचले. मानोरा शहरात दिग्रस मार्गावर असलेल्या पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने पुलावरून पाणी गेले. परिणामी, या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी प्रभावित झाली होती. मंगरूळपीर तालुक्यातील चिखलागड येथील अरुणावती नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेतात पाणी साचले.
०००००
बॉक्स
पुढील चार दिवस पावसाचे
नागपूर प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राने जिल्ह्यात ११ जून ते १४ जून या कालावधीत वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच १२ व १३ जून रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकरीबांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. लहान मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. पुलावरून तसेच नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. खबरदारी म्हणून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन हिंगे यांनी केले.