वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; रिठद गावाला पुराचा वेढा; संपर्क तुटला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 11:23 AM2020-07-05T11:23:59+5:302020-07-05T11:24:13+5:30
रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. दरम्यान रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला. शिरपूर परिसरातील जवळपास ३० एकर जमिन पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले.
यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीपासनूच कधी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. १४ जूनपर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर जवळपास ११ दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. २५ ते २७ जून दरम्यान पाऊस झाल्याने पिकांना संजीवणी मिळाली. जुलै महिन्याच्या सुरूवातीलाही पाऊस आल्याने शेतकरी सुखावला. दरम्यान ४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास वाशिम, रिसोड, मालेगावसह जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. रिठद परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर असल्याने गावाजवळून वाहणाºया अढळ नदीला पूर आला. पुराने गावाला वेढा घातल्याने जवळपास ३ ते ४ तास गावाचा संपर्क तुटला. नदीकाठ परिसरातील शेकडो एकर शेतातही पुराचे पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. शिरपूर परिसरातही पावसाचा जोर अधिक होता. रिसोड शहरातही गुरूवार, शुक्रवारी सायंकाळनंतर पाऊस झाल्याने काही दुकानांमध्ये पाणी शिरले.
वाशिम शहरातही पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले. खड्डयांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला.
चमूतर्फे पाहणी
संततधार पावसामुळे रिठद, शिरपूरसह अन्य ठिकाणी सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळावी याकरीता ४ जुलै रोजी शेतकºयांनी भ्रमणध्वनीवरून कृषी अधिकाºयांकडे पाहणी करण्याची मागणी केली. सोमवारपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात पावसामुळे जेथे पिकांचे नुकसान होत आहे ्रकिंवा पिकांचे नुकसान झाल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आल्या, तेथील नुकसानाची पाहणी महसूल व कृषी विभागाच्या चमूतर्फे केली जात आहे. ४ जुलै रोजीच्या पावसाने ज्या भागात पिकांचे नुकसान झाले, तेथे पाहणी करून पंचनामे केले जाणार आहे.
- एस.एम. तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.