वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; नदी, नाले ‘ओव्हर फ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:36 AM2020-08-18T11:36:57+5:302020-08-18T11:37:07+5:30
पैनगंगा, काटेपूर्णा, अरूणावती नदी वाहती झाली असून, नदीकाठावरील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या नऊ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असलेल्या पावसाने सोमवारीही जिल्हावासियांना झोडपले. पैनगंगा, काटेपूर्णा, अरूणावती नदी वाहती झाली असून, नदीकाठावरील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यापासूनच बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जून व जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढला असून, गत नऊ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात ठाण मांडून आहे. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. गत २४ तासांत जिल्ह्यात २२ मिमी पाऊस झाला असून, मूग व उडीद पिकांचे नुकसान अतोनात नुकसान होत आहे. ८ बॅरेज, गणेशपूरसह २० ते २२ प्रकल्पही ‘ओव्हरफ्लो’ झाले.
९ आॅगस्टपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. सोमवारीही पावसाची रिपरिप असल्याने शेतीची सर्व कामे प्रभावित होती. नऊ दिवसांपासून शेतीत कोणतीही कामे झाली नसल्याने पिकांमध्ये तणकटही वाढले तसेच सोंगणीला आलेल्या मूगाचे नुकसान झाले. शेतात पाणी साचून असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.
नुकसानग्रस्त भागात कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.
मानोरा शहरात घरात शिरले पाणी
मानोरा शहरात रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सोमवारी सकाळपासूनच ‘जेसीबी’च्या साहाय्याने पाणी काढून देण्यात आले. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.