कोरोना काळात अपहरणाच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:39 PM2020-10-19T12:39:04+5:302020-10-19T12:39:21+5:30
kidnapping increased Washim District यंदा जिल्ह्यातील एकूण ५२ मुली, महिलांचे अपहरण झाल्याच्या घटनांची नाेंद.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाकाळात यंदा जिल्ह्यातील एकूण ५२ मुली, महिलांचे अपहरण झाल्याच्या घटनांची नाेंद असून, गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा १० ने जास्त आहे. गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४२ जणींचे अपहरण झाले होते.
युवक, युवतींमध्ये सोशल मीडियाचा अतिरेक वापर होत असल्याने काही अनुचित प्रकारही घडत असल्याचे दिसून येते. विशेषत: १८ वर्षाआतील मुले, मुलींमध्ये सोशल मीडियाच्या विविध अपच्या वापर जास्त होत असल्याने आणि यावर अनेक पालकांचे नियंत्रण राहत नसल्याने फारशी समज नसलेल्या या वयात मुली या पळून जाण्याचा निर्णय घेतात तर अनेक मुलींचे विविध कारणामुळे अपहरणही केले जाते. जिल्ह्यात गेल्यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरी भागातील १२ तर ग्रामीण भागातील २० अशा एकूण ४२ जणींचे अपहरण झाले होते. यामध्ये १८ वर्षाआतील ३९ तर १८ वर्षावरील ३ जणींचा समावेश होता. यापैकी ९५ टक्के घटनांचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. यंदा कोरोनाकाळात मुलींचे अपहरण होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ५२ जणींचे अपहरण झाले. यामध्ये ८ वर्षाआतील ४६ तर १८ वर्षावरील ६ जणींचा समावेश होता. यापैकी अनेक घटनांचा छडा लावण्यात यंत्रणेला यश आले. विशेषत: लाखाळा परिसरातील अपहरण झालेल्या मुलीच्या प्रकरणाचा विशेष छडा लावला.