बारावीच्या पुरवणी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नामुळे होणारे नुकसान टळले; विद्यार्थ्यांना मिळणार दोन गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 06:19 PM2019-07-28T18:19:18+5:302019-07-28T18:19:40+5:30
चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गणित विषयाचा पेपर २५ जुलै रोजी झाला असून, या पेपरमध्ये दोन गुणांचा प्रश्न चुकीचा असल्याचा दावा गणित विषयाचे प्रा. पी.एन. देशमुख यांनी केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन गुण देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी केली. लोकमतने या संदर्भात २६ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे.
दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा सुरू असून, २५ जुलै रोजी इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर झाला. प्रश्नपत्रिकेतील १३ व्या क्रमांकाचा पर्यायी प्रश्न चुकीचा असल्याची बाब रिसोड येथील परीक्षा केंद्रावर गणित विषयाचे प्रा.पी.एन देशमुख यांच्या निदर्शनात आली. या पर्यायी प्रश्नाला २ गुण असून, हा प्रश्न चुकीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन गुणाचे नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमधून वर्तविली जात आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या या प्रश्नाचे दोन गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी प्रा. देशमुख यांनी केली होती. या संदर्भात लोकमतनेही २६ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन माध्यमिक परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले.
त्याची दखल परिक्षा मंडळाने घेतली असून, त्वरित याबाबत माहिती घेतली व या चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात परीक्षक, तपासणीस यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान टळले आहे.
इयत्ता बारावीच्या पुरवणी परिक्षेतील गणित विषयातील चुकीच्या प्रश्नाबाबत राज्यातील सर्व परीक्षा तपासनीसांना राज्य परिक्षा मंडळातर्फे सूचना देण्यात आल्या असून, या चुकीच्या प्रश्नामुळे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना दोन गुण देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.
- परेश खर्चे
परिक्षा मंडळ कर्मचारी,
अमरावती