जनावरांच्या चाऱ्याच्या दरात वाढ; पशूपालक त्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:22 PM2018-04-21T13:22:54+5:302018-04-21T13:22:54+5:30
वाशिम : जनावरांच्या चाराचे दर सद्यस्थितीत गगनाला भिडले आहेत. यामुळे पशुपालक त्रस्त झाले असून, महागाईवर नियंत्रण असावे, असा सूर पशूपालकांमधून उमटत आहे.
वाशिम : जनावरांच्या चाराचे दर सद्यस्थितीत गगनाला भिडले आहेत. यामुळे पशुपालक त्रस्त झाले असून, महागाईवर नियंत्रण असावे, असा सूर पशूपालकांमधून उमटत आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण सात लाखाच्या वर पशूधन आहे. प्रति जनावरांना ६ किलो या प्रमाणे सदर पशुधनाला दर महिन्याला ८२ हजार २०० मेट्रीक टन चारा आवश्यक आहे. दुधाळ जनावरांचे प्रमुख खाद्य म्हणून ओळखल्या जाणाºया सरकी ढेपीचे दर २०१७ च्या तुलनेत सद्या गगणाला भीडले आहेत. विदर्भातून कपाशीचे पीक हद्दपार होण्यासोबतच ढेपेचा अनधिकृतरित्या साठा करुन ठेवल्याने ही विदारक स्थिती उद्भवल्याचा दावा पशुपालकांनी केला आहे. सरकीपासून तयार होणाºया ढेपीचे दर २०१७ मध्ये १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल होते. २०१८ मध्ये बाजारपेठेत सरकी ढेपेची १५५० ते १८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे सर्वसामान्य पशूपालक आर्थिक डबघाईस आले आहेत.
दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला
एकिकडे पशुखाद्याचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे शासकीय दुध शीतकरण केंद्रांमध्ये पशुंच्या दुधाला म्हणावे तसे दर मिळत नाहीत. म्हशीपासून १ लिटर दुध मिळविण्याकरिता ३२ ते ३७ रुपये खर्च येतो, असा दावा पशुपालकांनी केला. पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण असावे, अशी अपेक्षा पशुपालकांनी व्यक्त केली.
चाऱ्याच्या भावाने बजेट कोलमडतेय
सरकी व ढेपीच्या वाढलेल्या दरांने पशुपालक हैराण झाले असताना कडबा व कुटीच्या भावाने त्यांच्या समोरच्या अडचणी अधिक प्रमाणात वाढविल्या आहेत. सोयाबिनचे कुटारही महागले आहे. २१०० ते २४०० रुपये गाडी याप्रमाणे सोयाबीन कुटाराचे भाव आहेत. तूर व हरभरा कुटारही स्वस्त नाही. पशुखाद्यांच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ झाल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. चारा टंचाई असल्याने बाजारभावात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.