बालमजुरांच्या संख्येत वाढ
By admin | Published: June 17, 2014 07:55 PM2014-06-17T19:55:22+5:302014-06-17T23:49:14+5:30
बालमजूर अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.
मानोरा : तालुक्यात असणार्या शहरातील टपरी, हॉटेल, बिअरबार, किराणा दुकान, कापड, दुकान व इतर ठिकाणी बालमजूर अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. बालकामगाराकडून कामे करून घेणे कायद्याने गुन्हा असूनसुद्धा त्यांना कमी पैशात कामावर ठेवण्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करून दुर्लक्षित धोरण अवलंबित असल्याने बालमजुरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अनेक बालक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. तसेच बालकामगार कायदा लागू करून १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना कामावर ठेवणे किंवा त्यांच्याकडून वेठबिगारीची कामे करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. शहरात तालुका प्रशासनाच्या आंधळ्या भूमिकेने बालकामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.वरील ठिकाणी कमी रकमेत दिवसभर काम करून घेऊन कामगारांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामध्ये व्यावसायिकांचा फायदा होत असून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने बालकामगारांच्या पाल्यांना कोंडित पकडून त्यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे त्यांच्या किशोरवयातील शिक्षण मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. शासनाने केलेल्या कडक कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे.