शहापूर येथे डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:48+5:302021-08-19T04:44:48+5:30
मंगरुळपीर : तालुक्यातील ग्राम शहापूर येथे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष व आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये ...
मंगरुळपीर : तालुक्यातील ग्राम शहापूर येथे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष व आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात आवश्यक उपयोजना व फवारणी करावी, यासाठी वारंवार ग्रामपंचायतीला मौखिक स्वरूपात तक्रारी केल्या, मात्र तक्रारींची दखल घेत नाही, असे निदर्शनास आल्यावर येथील प्रशिक मित्रमंडळाने १७ ऑगस्ट रोजी रात्री स्वखर्चाने शहापूर येथे धूरफवारणी केली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी मित्रमंडळाचे आभार मानले. शहापूर येथे हिवताप, सर्दी, खोकला या आजारांसह डेंग्यूच्या रुग्णांंत वाढ झाली असून, जवळपास २० ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, डेंग्यू आजाराने तोंड वर काढले आहे. थंडी-ताप, सर्दी रुग्णांंत वाढ झाली आहे. डेंग्यू, खोकला, विषमज्वर अशा आजारसदृश रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने हिवताप व डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तात्काळ आवश्यक उपाययोजना करून तसेच फवारणीची मोहीम हाती घेण्याची मागणी जनतेतून होत आहे.