मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ; वाशिमात आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 02:47 PM2020-02-07T14:47:45+5:302020-02-07T14:48:12+5:30
सामाजिक संघटनांनी ७ फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात काही अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून, काही मुलींचा शोध अद्याप लागला नसल्याने पोलीस प्रशासनाविरूद्ध ताशेरे ओढत सामाजिक संघटनांनी ७ फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढला. बेपत्ता मुलींचा शोध तातडीने लावण्याची मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वाशिम शहर व जिल्ह्यात अलिकडच्या काळात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही मुलींचा शोध लागला तर काही मुली अजूनही बेपत्ता आहेत. वाशिम शहरातील लाखाळा भागातील एक १५ वर्षीय मुलीचे १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले. यासंदर्भात वाशिम शहर पोलीस स्टेशनला तक्रारही देण्यात आली. अत्यंत संवेदनशील व चिंताजनक असणाºया या प्रकरणाचा शोध अद्याप लागला नसल्याने पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेच्या महिला आघाडीसह मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, छावा क्रांतीवीर सेना आदी सामाजिक संघटनांनी केला. या घटनांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी स्थानिक शिवाजी चौकातून आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे शाळकरी मुले, मुली अक्षरशा: दहशतीखाली वावरत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच बेपत्ता मुलीचा शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. यावेळी शेतकरी संघर्ष संघटना, महिला आघाडी, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, छावा क्रांतीवीर सेना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थिनी, महिला, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.