बुद्धीची उंची, मनाची व्यापकता वाढवा! - डॉ. हेमंत खडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:14 PM2018-12-15T15:14:09+5:302018-12-15T15:14:32+5:30
बुद्धीची उंची आणि मनाची व्यापकता वाढवा, असे भाष्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाचे अधिव्याख्याता डॉ. हेमंत खडके यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : हे जीवन सुंदर आहे. त्यात सुख आणि दु:ख हे अपरिहार्य आहे. आपल्या जगण्यात समतोल हवा. जीवनाचा समतोल विचार हवा. त्यासाठी बुद्धीची उंची आणि मनाची व्यापकता वाढवा, असे भाष्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाचे अधिव्याख्याता डॉ. हेमंत खडके यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वाशीमच्यावतीने आयोजित स्वर्गीय द. चिं. सोमण स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते १४ डिसेंबर रोजी बोलत होते. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर होते. सुप्रसिद्ध लेखकद्वय नामदेव कांबळे आणि बाबाराव मुसळे व्यासपीठावर उपस्थित होते. 'सुखी माणसाचा सदरा' हा विषय फुलविताना डॉ. खडके यांनी रसेल, संत तुकाराम आणि गुलाबराव महाराजांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान सोप्या शब्दात मांडले. ते म्हणाले, सुख एकसारखेच असते. दु:ख मात्र हजार प्रकारचे असते. आत्यंतिक पापभिरू, आत्मलीन आणि अहंमन्य माणसे लवकर दु:खी होतात. इतरांशी स्पर्धा हे सुद्धा मानसिक तणाव वाढविणारे कष्टप्रद वास्तव आहे. केवळ पैसा आणि यशाच्या मागे लागून भावाशी, पत्नीशी स्पर्धा करणारे महाभागही आहेत. स्वत:जवळ जे आहे, त्याचा आनंद न घेता दुसºया जवळचे जे आहे, त्याचंच दु:ख आपण जास्त बाळगतो. भीतीची भीती कमी व्हावी. माणसाने सतत उत्तेजनाही शोधू नये. भूक आणि अन्न यांचे जे नाते आहे, तेच उत्साह आणि जीवनाचे आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीत उत्साह मिसळा, असे विवेचन त्यांनी केले.
प्रा. क्षीरसागर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. डॉ. संजय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. गजानन वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. मेघा देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य डॉ संजय चौधरी यांनी आभार मानले. थंडीची लाट असतानाही डॉ. खडके यांना ऐकण्यासाठी सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते.