कारंजा बायपासवर अपघातांचे प्रमाण वाढले
By admin | Published: October 29, 2014 11:58 PM2014-10-29T23:58:26+5:302014-10-29T23:58:26+5:30
गतिरोधक व ट्राफिक सिग्नल बसविण्याची मागणी.
कारंजा लाड (वाशिम) : गतिरोधक व ट्राफिक सिग्नल नसल्याने येथील बायपासवरील वाहतूक व्यवस्था बेलगाम झाली असून, अपघातप्रवण स्थळ म्हणून नवी ओळख ह्यबायपासह्णला मिळत आहे.
शहराच्या विस्तारीकरणामुळे बायपास परिसरात असंख्य वस्त्या निर्माण झाल्या आहेत. पण, शाळा, महाविद्यालय आणि मुख्य बाजारपेठ गावातच असल्यामुळे बायपास परिसरातील नागरिकांना दररोज या ना त्या कारणामुळे गावात जाण्यासाठी बायपास चौकातूनच आवागमन करावे लागते. याशिवाय बायपास चौकातून अकोला, अमरावती, मंगरुळ पीर, वाशिम, मानोरा, दारव्हा, यवतमाळ व कारंजा शहराकडे रस्ते जातात. त्यामुळे बायपासवरील राणी झाँशी चौकात सकाळी सातपासून रात्री ११ पर्यंत वाहनांची वर्दळ पाहायला मिळते.
बायपासवर दोन चौक असून, दोन्ही चौकाच्या मार्गावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. परिणामी येथून वाहनांची प्रचंड वेगाने आवागमन होते. बायपासवरून ट्रक, एस.टी. बस, कार, ऑटोरिक्षा, मोटारसायकल अशा वाहनांची नेहमीच रेलचेल असते. बायपासवरून शेलूबाजार, पिंजर, दारव्हा, यवतमाळ या गावासह अनेक ग्रामीण भागात जाण्याकरिता बस व ऑटोरिक्षा मिळतात. वाहन मिळविण्याकरिता नागरिक या चौकात उभे राहतात तसेच वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
बायपासवरून मोठय़ा शहराकडे जाणार्या सर्व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने डांबरीकरण करण्यात आले. परंतु, रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. रस्ते चांगले झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. बाय पासवरील चौकात वाहनधारकांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे, याचा अंदाज घेणेही येथे कठीण जाते. त्यामुळे अनेक वाहनांची येथे समोरासमोर धडक झाली आहे.