वाशिम जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवा - नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 04:39 PM2022-04-19T16:39:32+5:302022-04-19T16:40:13+5:30
Narayan Rane at Washim : जिल्ह्यातील विविध योजनांच्या अमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे वाशिमच्या दौऱ्याव आले होते.
वाशिम: आकांक्षित जिल्हा असलेल्या वाशिममधील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी, उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी दिले. जिल्ह्यातील विविध योजनांच्या अमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे वाशिमच्या दौऱ्याव आले होते. केंद्रीय मंत्री लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार ना. नारायण राणे हे मंगळवार १९ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानजिक नियोजन भवनात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या योजनांची विस्तृत माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न किती, असा प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला व दरडाेई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले, तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, लोकप्रतिनिधी व यंत्रणांनी उदासीनता झटकून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करून मागास असलेल्या वाशिम जिल्ह्यास लागलेला आकांक्षितचा ठपका पुसून टाकण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. आकांक्षित जिल्हा आढावा बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार लखन मलिक, राजेंद्र पाटणी, विधानपरिषद सदस्य डॉ.रणजीत पाटील, वसंत खंडेलवाल यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कृषी विभागाचा घेतला समाचार
आकांक्षित वाशिम जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कृषी विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची कानउघाडणी केली.