अवैध गर्भपातप्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:46 AM2021-08-24T04:46:04+5:302021-08-24T04:46:04+5:30
हेल्पलाइन क्रमांकावर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चमूने डॉ. शशिकांत सारसकर ...
हेल्पलाइन क्रमांकावर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चमूने डॉ. शशिकांत सारसकर याच्या दवाखान्याची अचानक तपासणी केली. त्याठिकाणी दाखल एका महिलेवर गर्भपातासाठी अवैधपणे उपचार करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. सारसकर व बोगस डॉक्टर विलास ठाकरे या दोघांविरुद्ध वाशिम शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून चाैकशी सुरू केली. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांच्याही पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ केली, अशी माहिती तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी दिली.
.................
बाॅक्स :
प्रत्येक गर्भपातामागे सारसकरला मिळायची ठराविक रक्कम
बोगस डॉक्टर विलास ठाकरे हा पाच ते सहा वर्षे एका दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करीत होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तो अवैध गर्भपात प्रकरणात सक्रीय झाला. डॉ. शशिकांत सारसकर यांच्या दवाखान्यात महिलांना दाखल करून अवैध गर्भपात घडवून आणला जायचा. त्याबदल्यात डॉ. सारसकर यांना ठराविक रक्कम दिली जायची, अशी माहिती पोलीस तपासांत निष्पन्न झाली.
.................
औषध खरेदीच्या ठिकाणाचा पत्ता लागेना
गर्भपातासाठी आवश्यक असलेली औषध खरेदी नेमकी एखाद्या मेडिकलवरून खरेदी केली किंवा ऑनलाइन मागविली, याचा पत्ता अद्याप लागलेला नाही. दोन्ही आरोपींना बीपी, शुगरचा त्रास असल्याने तपासकार्यात अडथळा जाणवत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.