बांधकाम साहित्याच्या किंमतीत वाढ; व्यावसायिक अडचणीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:46 AM2020-05-29T10:46:19+5:302020-05-29T10:46:32+5:30
सहा हजाराच्या आसपास प्रती ब्रास असलेली रेती आता ८ हजार रुपयाच्या आसपास मिळत आहे.
संतोष वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लॉकडाउनमध्ये २४ मार्चपासून ठप्प असलेली विविध प्रकारची बांधकामे ४ मे पासून बऱ्याच प्रमाणात सुरू झाली. मात्र, बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिकांसह घर बांधकाम करणाऱ्यांनाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. लॉकडाउनपूर्वी सहा हजाराच्या आसपास प्रती ब्रास असलेली रेती आता ८ हजार रुपयाच्या आसपास मिळत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून देशात २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. या दरम्यान सर्वच प्रकारातील व्यवसायांना जबर फटका बसला. यामधून बांधकाम क्षेत्रही सुटू शकले नाही. वाशिम जिल्ह्याचा समावेश हा ‘नॉन रेड झोन’मध्ये असल्याने बांधकाम क्षेत्राला सुट मिळाली. नागरिक आपले घराचे स्वप्न साकारण्यासाठी अपूर्ण राहिलेले बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर बांधकाम व्यावसायिकदेखील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. दुसरीकडे याच दरम्यान, सिमेंट, लोखंड, वीट, रेती आदींच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका घर बांधकाम करणाºया नागरिकांना तसेच बांधकाम व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.
लॉकडाउनपूर्वी सिमेंटची प्रती बॅग २७० ते २८० रुपयाला मिळत होती. आता याच बॅगची किंमत ३९० ते ४०० रुपयादरम्यान आहे. दोन महिन्यांपूर्वी लोखंडाचे भाव ३८०० ते ३९०० रुपये क्विंटल होते. आता ४८०० ते ४९०० रुपये प्रती क्विंटल असे दर आहेत. लॉकडाउनपूर्वी ६८०० रुपयाला एक हजार वीट मिळत होती. आता हेच दर ७८०० ते ७९०० रुपयादरम्यान आहेत. दोन महिन्याच्या कालावधीत रेतीच्या प्रती ब्रास किंमतीत दोन हजार रुपयाने वाढ झाली आहे. वाढत्या किंमतीचा भुर्दंड व्यावसायिकांना बसत आहे.