कारंजासह ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ!

By Admin | Published: July 15, 2017 01:54 AM2017-07-15T01:54:57+5:302017-07-15T01:54:57+5:30

नागरिक भयभीत : दोन महिन्यात सात लाख रुपयांपेक्षा अधिक ऐवज लंपास

Increase in stolen property in rural areas with carnajas! | कारंजासह ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ!

कारंजासह ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : शैक्षणिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या कारंजा शहर गत दोन महिन्यांपासून चोरट्यांचा दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येते. गत दोन महिन्यांत सात लाख रुपयांपेक्षा अधिक ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून, अद्याप चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले नाही.
कारंजा शहरात शहरासाठी व ग्रामीण भागासाठी, असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन आहेत. शहरातील अवैध धंदे व चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलीस यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे. शहरासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या जून ते जुलै महिन्यात जवळपास पाच ठिकाणी दिवसासह रात्री चोरट्यांनी मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. याशिवाय भुरट्या चोऱ्याही सुरू असल्याने नागरिक भयभीत आहेत.
कारंजा शहर पोलीस स्टेशनला ८१ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, तर ८० पोलीस कर्मचारी आहेत. यामध्ये चार महिला व पाच चालकांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनला ७३ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एक पोलीस निरीक्षक, १ सहायक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या जून महिन्यापासून, तर आतापर्यंत चोऱ्या मोठ्याा प्रमाणात झाल्याचे दिसून येते. दिवसाही चोऱ्या होत आहे. पोलिसांचा वचक नसल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे बोलले जाते. कारंजा भाजीबाजार येथील एक दुकान फोडून दुकानातील रोख ५४ हजार ३०० रुपयांचा माल चोरी गेल्याची घटना १६ जूनच्या रात्री घडली होती. काही दिवसांतच शिक्षक कॉलनीतील बलदेव रंगराव चव्हाण यांच्या घरातून १ लाख ६० हजार रुपयाचा माल लंपास केला. २९ जून रोजी ज्ञानेश्वर जयसिंग गळकर रा. कारंजा यांच्या घरी दिवसा चोरी होऊन ६० हजार रुपयांचा माल चोरी गेला. ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील ग्राम कामठवाडा येथे रात्रीच्या वेळी बकरी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला गावकऱ्यांनी १ जुलैच्या पहाटे पकडले. ११ जुलै रोजी यशोदानगरातील प्रा. प्रेमनाथ दाभाडे हे घर मालक बाहेरगावी, तर महिला टायपिंगला गेली असल्याचे पाहून घराच्या मुख्य दाराचे कुलूप फोडून घरामधील १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. तसेच कारंजा शहरातील लाहोटी प्लॉटमध्ये रहिवासी असलेले समीर खा अमीर खा हे ८ ते १३ जुलैदरम्यान गावाला गेले होते. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप फोडून घरामधील दोन सोन्याच्या अंगठ्या व दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना १३ जुलै रोजी उघडकीस आली. याकडे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्यासह ठाणेदारांनी लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.

चोरींची प्रमाण वाढले, हे निश्चित आहे. मागील काळात झालेल्या चोऱ्यांचा अभ्यास करून या चोऱ्यांचा तपास पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यासाठी नागरिकांनी अनोळखी इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्यास पोलिसांना कळवावे. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबांनी पोलिसांना माहिती द्यावी.
डॉ. रत्नाकर नवले
उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा

Web Title: Increase in stolen property in rural areas with carnajas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.