लालपरीचे उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता मिळवा! चालक, वाहकांसाठी एसटी महामंडळाची योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:25 IST2024-12-30T14:24:48+5:302024-12-30T14:25:24+5:30
...या संदर्भात २६ डिसेंबरला सर्व विभाग नियंत्रकांना पत्र सादर करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लालपरीचे उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता मिळवा! चालक, वाहकांसाठी एसटी महामंडळाची योजना
वाशिम : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी महामंडळाकडून विविध उपक्रम राबविण्यासह विविध योजनांचीही अंमलबजावणी केली जाते. याच अंतर्गत महामंडळाकडून चालक, वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या संदर्भात २६ डिसेंबरला सर्व विभाग नियंत्रकांना पत्र सादर करून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चालक, वाहकांना मिळणार २०%
प्रत्येक आगाराचे लेखाकार आणि सहायक वाहतूक अधीक्षकांकडून आर्थिक ताळेबंद तपासला जाईल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जेवढे अधिक उत्पन्न मिळाले, त्याच्या २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून चालक, वाहकांना (प्रत्येकी १० टक्के) विभागून दिली जाईल.
विविध आव्हाने पार करत सेवा
- उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता ही योजना एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे.
- मागणीच्या तुलनेत अपुरी बससंख्या, मोडकळीस आलेल्या बसेस, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आदी अनेक आव्हाने पार करत, एसटीकडून प्रवाशांना सेवा दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिक अमृत योजना, महिला सन्मान योजनांमुळे एसटीच्या उत्पन्नात लक्षवेधी भर पडली आहे.
- तथापि, काही चालक-वाहकांकडून प्रवासी संख्या वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. बस थांब्यावर न थांबता थेट निघून जात असल्याच्या तक्रारी एसटीकडे प्राप्त होतात. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, विशेष परिश्रम घेऊन चालक, वाहकाने एसटीच्या उत्पन्नात भर टाकल्यास त्यांनाही या योजनेतून लाभ होणार आहे.
काय आहे योजना?
योजनेचा कालावधी हा ३१ दिवसांचा राहणार आहे. उत्पन्नाचा तुलनात्मक आढावा घेण्यात येईल.
या दिवसांतील प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाची गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या उत्पन्नाची तुलना केली जाईल.
त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती उत्पन्न वाढले, त्याचा हिशेब करून संबंधित वाहक-चालकांना प्रोत्साहन भत्ता दिला जणार आहे.