नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे मारसूळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:53 PM2020-02-09T17:53:19+5:302020-02-09T17:53:23+5:30
नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे मारसूळ जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद केंद्रीय शाळा मारसुळ येथे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने या शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येत वाढ झाली आहे.
जिल्हा परिषद शाळा मारसूळ येथे लोकवर्गणी व शासन निधीतून संगणक कक्ष, नाविण्यपूर्ण बालविज्ञान केंद्र, वाचनालय, बालसंशोधन जपवणुक केंद, सेंद्रीय भाजीपाला, शुध्दजल, हँडवॉश स्टेशन यासह अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. या शाळेने १२ निराधार मुलांना आधार दिला आहे. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने अन्य ठिकाणच्या कॉन्व्हेंटमधील तब्बल २२ विद्यार्थी परत या शाळेत परतले आहेत. १३ जुन २०१८ रोजी मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर मनोहर बाहे यांनी सरपंचपती रामेश्वर घुगे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, गावकरी व शिक्षकांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविले. सन २०१८ मध्ये १२९ असलेला विद्यार्थी पट हा २०१९ मध्ये १५२ वर पोहोचला. केंद्र प्रमुख दिलीप गवई यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. शाळा विकासासाठी सर्वप्रथम केंद्र प्रमुखांसह सर्व शिक्षकांनी प्रत्येक ी ५ हजार रुपये प्रमाणे वर्गणी गोळा करुन वीजपुरवठा व मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तब्बल ३०० फुट अंतरावरुन पाणी आणुन मुलांना शुध्दजल देणे सुरु झाले. भाषा, गणित, विज्ञान आदी विषयांत नाविण्यपूर्ण उपक्रमांचा वापर करून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व विद्यार्थीकेंद्रीत बनविली. याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.
सर्वांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास कसा साधला येईल, याला प्राधान्य दिले आहे. नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे या शाळेच्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.
-मनोहर बाहे, मुख्याध्यापक
मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास चांगल्या प्रकारे साधला जात आहे, याचा पालक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अर्चना घुगे, पालक
नाविण्यपूर्ण बालविज्ञान केंद्र
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोड लागावी याकरीता मारसूळ शाळेत बालविज्ञान केंद्र उभारण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी पालक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकºयांचे सहकार्य घेतले. शासन निधी व लोकवर्गणीतून भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. सेंद्रीय भाजीपाला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी भाजीपाल्यांचे महत्व सांगितले जात आहे.