लहान मुलांमध्ये वाढली सर्दी, तापाची लक्षणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:55+5:302021-04-18T04:40:55+5:30
वाशिम : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आदी लक्षणे आढळून येत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. कोविडसदृश ...
वाशिम : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यातील लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आदी लक्षणे आढळून येत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. कोविडसदृश लक्षणे असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पालकांनी घाबरून न जाता बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असून, त्यातच लहान मुलेही सर्दी, ताप व खोकला आदी आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लहान मुलांच्या दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली असून अनेक पालक कोरोनाच्या भीतीपोटी भ्रमणध्वनीद्वारेच डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. राज्यातील काही भागांत १० वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लहान मुलांसाठीदेखील कोरोनाचा धोका वाढत आहे. जिल्ह्यातील कोविडबाधित रुग्णांमध्ये १० वर्षांखालील काही बालकांचा समावेश असल्याने चिंता वाढत आहे. सध्या व्हायरल फिव्हरमुळे बालकांना ताप, सर्दी अशी लक्षणे आढळून येतात. सध्या कोरोनाकाळ असल्याने आणि ताप, सर्दी आढळून येत असल्याने बालकांनाही कोरोनाचा संसर्ग तर होणार नाही ना, अशी भीती वर्तविली जात आहे. बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास बालकांना सर्वांपासून वेगळे ठेवण्याची वेळ येईल, या भीतीपोटी पालकही बालकांच्या कोविड चाचणीला टाळत असल्याचे चित्र दिसून आले. ही स्थिती पाहता बालकांनाही कोरोनाचा धोका कायम असून पालकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.
००००
काय आहेत लक्षणे
अनेक बालकांना सर्दी, ताप, खोकला, हगवण लागणे आदी लक्षणे आढळून येतात. बालकांमध्ये ही लक्षणे आढळताच पालकांनी त्यांना तत्काळ बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते बालकांमधील या समस्या नेहमीच्याच औषधांनी सुटत असल्याने पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, या लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
००००
तर ‘कावासाकी’ आजाराचाही धोका
कुटुंबात कुणाला कोरोना होऊन गेल्यानंतर लहान बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळल्यास किंवा अंगावर चट्टे येणे, तोंड येणे, डोळे येणे आदी लक्षणे आढळल्यास बालकांना कावासाकी हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पालकांनी तत्काळ बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
००००
त्रिसूत्रीचे पालन करणे शिकवा
लहान मुलांना कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारांपासून बचावासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे मार्गदर्शन पालकांनी करावे. यामध्ये प्रामुख्याने मास्क कसा घालावा, इतरांपासून सुरक्षित अंतर कसे राखावे तसेच वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे आदींचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून केले जात आहे.
००००
जिल्ह्यात सध्या अनेक बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आली आहेत. मात्र, पालकांनी यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अशी लक्षणे दिसताच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. प्रवीण वानखेडे,
बालरोगतज्ज्ञ, वाशिम