कोरोना काळात वाढली जि.प. विद्यार्थ्यांची पटसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:28+5:302021-08-12T04:46:28+5:30
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७४० शाळा आहेत. गत काही वर्षांत खासगी शाळांत पाल्यांचे प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढला होता. ...
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७४० शाळा आहेत. गत काही वर्षांत खासगी शाळांत पाल्यांचे प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढला होता. त्यामुळे जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली होती. जिल्ह्यातील २० शाळांत, तर २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्याने या शाळा बंद करण्याची पाळी आली होती, तर शिक्षकांची पदेही अतिरिक्त ठरू लागल्याने जि.प. शाळांचे भवितव्यच अंधारात सापडले होते. दरम्यान, गतवर्षीपासून जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले. वाशिम जिल्हाही यातून सुटला नाही. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या जिवाचा विचार करता शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शिक्षण विभागाने दिला. तेव्हापासून खासगी शाळांचेही वर्ग बंदच आहेत. ऑनलाइन शिक्षण असतानाही खासगी शाळांकडून वारेमाप शुल्क वसूल केले जात आहेच शिवाय स्मार्ट फोन आणि महिन्याच्या इंटरनेटचा खर्चही वाढला आहे. त्यात ग्रामीण भागांत इंटरनेटची विस्कळीत सेवा आदी कारणांमुळे शेकडो पालकांनी त्यांच्या पाल्यांचे जि.प. शाळांत नाव दाखल करणेच पसंत केले. त्यामुळे जि.प. शाळांच्या पटसंख्येत जवळपास अडीच हजारांची वाढ झाली आहे.
-----------------------
खर्च वाढला, दर्जा नाही
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अद्यापही प्राथमिकच्या शाळा सुरू झालेल्या नसून, ऑनलाइन शिक्षणावरच भर दिला जात आहे. त्यात खासगी शाळांचे वारेमाप शुल्क अदा करूनही स्मार्ट फोनसह इंटरनेट व पुस्तकांचा खर्च पालकांना करावा लागत आहे. तथापि, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा मात्र वाढलेला नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाशी अद्यापही जुळवून घेता आलेले नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना जि.प. शाळांतच टाकणे पसंत केले आहे.
----------------------
पहिल्या वर्गात अधिक वाढ
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असल्याने खासगी शाळांत पाल्यांचा प्रवेश करण्यात फारसा अर्थ पालकांना वाटला नाही. त्यामुळे पहिल्या वर्गात पाल्यांचा प्रवेश करण्यासाठी पालकांनी जि.प. शाळेलाच अधिक पसंती दिली. तथापि, दुसरी ते सातव्या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नव्याने प्रक्रिया राबविताना अर्थात शहरातील शाळांतून गावातील जि.प. शाळांत नाव दाखल करण्यात फारसा उत्साह दाखविला नसल्याचेही दिसले.
----------------------
संचमान्यतेनंतर चित्र अधिक होणार अधिक स्पष्ट
जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची अंतिम संख्या ही संचमान्यतेनंतर स्पष्ट होते. संचमान्यतेनुसारच शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या गृहीत धरली जाते. तथापि, जि.प. शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पार पडते. त्यामुळे सद्यस्थितीत जि.प. शिक्षण विभागाकडील माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत जी वाढ दिसत आहे. त्यात आणखी किती भर पडते किंवा किती घट होते, हे संचमान्यतेनंतरच स्पष्ट होईल.
कोट: कोरोना काळात दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. जि.प. शिक्षण विभागाने या काळात वेगवेगळे पर्याय शोधून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात प्रभावी कामगिरी केली. शिवाय शैक्षणिक योजनांची अंमलबजावणीही व्यवस्थित झाली. त्यामुळे यंदा जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढत असल्याचे आजवरच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
-गजाननराव डाबेराव,
प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम
----------------------------
वर्गनिहाय वाढलेली विद्यार्थी संख्या
वर्ग - २०२०-२१ - २०२१-२२
पहिली - १९६९० - २११३०
दुसरी - २०१९८ - २०३१९
तिसरी - १९६९८ - २०१०९
चौथी - २११७७ - २१५१०
पाचवी - २१०५२ - २१०९०
सहावी - २११३६ - २११९०
सातवी - २१४३६ - २१५१२
---------------------------------
एकूण १४४३५७ १४६८६०