आवक वाढली; भाव घसरले !

By admin | Published: November 4, 2015 03:02 AM2015-11-04T03:02:38+5:302015-11-04T03:02:38+5:30

दिवाळीच्या पृष्ठभूमीवर सोयाबीनची मोठय़ा प्रमाणात विक्री : उत्पादकांची घोर निराशा.

Increased inward; The price drops! | आवक वाढली; भाव घसरले !

आवक वाढली; भाव घसरले !

Next

दादाराव गायकवाड / वाशिम : एकामागून एक कोसळणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटांमधून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी सोयाबीनच्या घसरलेल्या बाजारभावानेही निराशाच आली आहे. एकिकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढत असताना, बाजारभावही कोसळत आहेत. गत पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात ३५0 ते ४00 रुपयांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळी परिस्थितीला वैतागला आहे. मागील तीन वर्षांंतील दुष्काळामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्याशिवाय सणावारांत खर्चासाठी पैसाच हाती नसल्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेसाठी शेतमालाची साठवणूक न करता शेतकर्‍यांनी सर्वच शेतमाल विकण्याची घाई करीत आहेत. खरीप हंगामात उत्पादनात ५0 टक्क्यांहून अधिक घट येऊनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध शेतमालाच्या आवकीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर बाजार समितीत गतवर्षी १,२२,९६0 क्विंटल तर यावर्षी १४८५३६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे, तसेच कारंजा बाजार समितीत गतवर्षी १,४७,७१0 क्विंटल तर यावर्षी २,३९,0५६ क्विंटल आवक झाली आहे. शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडावे, तोंडावर आलेल्या सणावारांसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी, अशा विविध चिंता त्याला सतावत आहेत. यंदा अवर्षणामुळे खरिपाच्या उत्पादनात ५0 टक्क्यांहून अधिक घट आली. कित्येक शेतकर्‍यांना तर शेतीसाठी केलेला खर्च वसूल होण्यापुरतेही धान्य पिकले नाही. कुठे तर सोयाबीनच्या उत्पादनात एवढी घट दिसून आली की, उत्पादनापेक्षा त्याची सोंगणी करण्यासाठीच अधिक खर्च लागण्याची शक्यता असल्याने त्या शेतकर्‍यांनी सोयाबीनची सोंगणीच केली नाही. शेती उत्पादनात यंदा मोठय़ा प्रमाणात घट आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक धान्याची आवक निम्म्यावर येणे अपेक्षित होते; परंतु जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा आणि कारंजा या तीन ठिकाणच्या बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक वाढल्याचे निदर्शनास आले; परंतु ही आवक शेतमालाचे उत्पादन वाढल्यामुळे नव्हे, तर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांनी साठवणुकीकडे केलेली पाठ, सुरुवातीच्या तेजीनंतर सतत पडत चाललेले भाव, तसेच सणावाराचे दिवस आदी कारणांमुळे वाढल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. १५ ऑक्टोबरला चार हजाराच्या आसपास असलेले भाव ३ नोव्हेंबरला ३६00 पर्यंंत कोसळले आहेत.

Web Title: Increased inward; The price drops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.