प्रयोगशाळेवरील ताण वाढला ; कोरोना चाचणी अहवाल मिळण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:39 PM2021-04-22T12:39:16+5:302021-04-22T12:39:23+5:30

Increased load on the lab; Corona test report delayed : गैरसोय टाळण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना मोबाईलवर संदेश पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

Increased load on the lab; Corona test report delayed | प्रयोगशाळेवरील ताण वाढला ; कोरोना चाचणी अहवाल मिळण्यास विलंब

प्रयोगशाळेवरील ताण वाढला ; कोरोना चाचणी अहवाल मिळण्यास विलंब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवसाचा विलंब होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना मोबाईलवर संदेश पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मेडशी ता. मालेगाव आढळला होता. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. गतवर्षी मार्च ते ऑक्टोबर या दरम्यान जिल्ह्यात आरटी- पीसीआर प्रयोगशाळा नसल्याने संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे पाठविण्यात येत होते. त्यानंतर जिल्ह्यातच आरटी-पीसीआर प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध झाल्याने स्वॅब नमुने तपासणी आणि अहवाल मिळण्यासाठीची दिरंगाई दूर झाली. 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत होत असून, राज्यातच सर्वत्रच कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही दैनंदिन सरासरी ३५० रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, दैनंदिन दीड हजारांवर चाचण्या होत असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत आहे. त्यातच रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या तालुक्यातील संदिग्धांचे स्वॅब नमुने घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाशिम येथील प्रयोगशाळेला प्राप्त होतात. दोन, तीन दिवसानंतर अहवाल तयार झाला की पुन्हा दुसऱ्या दिवशी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी पाठविला जातो. यामध्ये तीन, चार दिवसाचा कालावधी जात असल्याने आणि या कालावधीत स्वॅब दिलेला संदिग्ध रुग्ण गृह विलगीकरणातच राहील याची कोणतीही शाश्वती नसल्याने त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही दिरंगाई टाळण्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने संबंधित रुग्णाला मोबाईलद्वारे संदेश देण्याची यंत्रणा उभारली जात आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले. 

स्वॅब दिल्यानंतर गृह विलगीकरणातच राहावे !
सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर संबंधितांकडून स्वॅब नमुना दिला जातो. या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधितांनी गृह विलगीकरणातच राहणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकजण बिनधास्तपणे बाहेर फिरतात ; एवढेच नव्हे तर शासकीय, निमशासकीय सेवेतील काही कर्मचारी देखील स्वॅब दिल्यानंतर कार्यालयात जातात. त्यामुळे देखील कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. स्वॅब दिल्यानंतर अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित इतरांच्या संपर्कात न येणे किंवा गृह विलगीकरणातच राहणे अपेक्षित आहे.

सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास प्रत्येकाने कोरोना चाचणी करावी. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यास संबंधितांच्या मोबाईलवर संपर्क साधून तसे कळविण्यात येत आहे. स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही पूर्णत्वाकडे आली आहे. स्वॅब दिल्यानंतर इतरांच्या संपर्कात न येता प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
-  शण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी,वाशिम


कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी अहवाल दिला जातो. कोविड केअर सेंटरमधील संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वॅब घेतलेल्यांना अहवाल तातडीने द्यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. स्वॅब दिलेल्यांनी गृह विलगीकरणात राहून आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक,
 वाशिम.

Web Title: Increased load on the lab; Corona test report delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.