मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:51+5:302021-05-10T04:40:51+5:30
वाशिम जिल्ह्यात ८ मे पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३१ हजार ६०५ वर पोहोचला आहे. ३३२ जणांचा कोरोनाने मृत्यू ...
वाशिम जिल्ह्यात ८ मे पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३१ हजार ६०५ वर पोहोचला आहे. ३३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ४४७७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कोविड केअर सेंटर व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. दरम्यान, सातत्याने कोरोनासंबंधीच्या बातम्या, या संसर्गाने ओढवणाऱ्या मृत्यूच्या वार्ता ऐकून अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील काही नगरपालिकांनी नागरिकांवर ओढावणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी हेल्पलाईन तयार केली आहे; मात्र वाशिम किंवा जिल्ह्यातील इतर तीन नगरपालिका व दोन नगरपंचायतींमध्ये अशी कुठलीही सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडणारे नागरिक मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
..............................
बाॅक्स :
पुरूष सर्वाधिक तणावात
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषच सर्वाधिक तणावात आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर नोकऱ्या जाण्याचे गडांतर ओढवले आहे. काही लोकांचे रोजगार अनेक दिवसांपासून ठप्प आहेत. यासह कोरोनाच्या काळातही नोकरीनिमित्त पुरूषांना सातत्याने बाहेर राहावे लागते. घरी परत गेल्यानंतर कुटुंबास आपल्यापासून काही धोका तर होणार नाही, या चिंतेने पुरूषांना ग्रासले आहे. ही कारणेच तणाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.
.................
तरूणांचे प्रश्न वेगळेच
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या १४ महिन्यांपासून शिक्षण क्षेत्र पूर्ण कोलमडले आहे. ऑनलाईन शिक्षणाची मात्रा प्रभावी ठरली नाही. अशातच २०२१ मधील शैक्षणिक वर्षही संपुष्टात आले.
विशेषत: दहावी, बारावी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या हुशार, होतकरू तरुणांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. काही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.
कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात असताना आयुष्यातील एक-एक वर्ष देखील कमी होत आहे. त्यामुळे कमी वयात अधिक शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तरुण चिंतातूर झाले आहेत. यापुढेही शिक्षणाची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात नोकरीचा प्रश्न गंभीर होणार, या विवंचनेत काही तरूण सापडले आहेत.
.......................
नोकरी गेली, आता काय करू
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने गेल्या १४ महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासन, प्रशासनास नाईलाजास्तव जमावबंदी, लाॅकडाऊन लावावा लागत आहे. यामुळे कारखाने, कंपन्या, बाजारपेठेतील दुकाने बंद राहून व्यवसाय ठप्प झालेला आहे. परिणामी, अनेकांच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातील अनेकजण कुटुंबातील कर्ते पुरूष आहेत. नोकरी गेल्याने आता काय करावे, ही चिंता त्यांना सतावत आहे.
.....................
कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?
कुटुंबातील प्रत्येकाच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळताना कर्त्या पुरूषांवर कोणतेही संकट आले तरी ते सहजासहजी व्यक्त होत नाहीत किंवा चेहऱ्यावरची चिंता घरच्यांना दाखवत नाहीत, असे मानले जाते, मात्र कोरोनाच्या संकटाने सर्व मर्यादा उघड केल्या आहेत. रोजगार ठप्प होण्यासह अनेकांना नोकऱ्या हातून निसटल्याने सातत्याने घरातच बसून राहावे लागत आहे. कुटुंबही याबाबत अवगत व्हावे, म्हणून पुरूषही आता मनमोकळणेपणाने व्यक्त व्हायला लागले आहेत.
.........................
कोट :
कोरोनाच्या संकटामुळे आज जो-तो मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. या संकटाने अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण केली आहे. त्याचा सर्वाधिक ताण साहजिकच पुरूषांवर येत आहे. त्यातूनच चिंता, नैराश्याने बहुतांश नागरिकांना ग्रासले आहे. हे टाळण्यासाठी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. दूरचित्रवाणीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहणे, नियमित व्यायाम करणे, एकमेकांना आधार देणे, हेच त्यावरील रामबाण औषध ठरू शकते.
- डाॅ. नरेश इंगळे
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम