जिल्ह्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:20+5:302021-01-08T06:12:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शासनाने मुलींच्या विवाहासाठी १८ वर्षे वय पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. असे असताना राज्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाने मुलींच्या विवाहासाठी १८ वर्षे वय पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. असे असताना राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यातही ग्रामीण भागात काही ठिकाणी कमी वयातच मुलींचे लग्न लाऊन देण्याचे प्रकार घडत आहेत. माहिती मिळाल्यास महिला व बालविकास विभागाकडून कारवाई केली जाते; मात्र बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून गावपातळीवर कार्यरत ग्रामसेवक आणि गावच्या पोलीस पाटलांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यात बालविवाहाची प्रथा कायमची मोडीत काढता येणे अशक्य झाले आहे.
१८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुली अल्पवयीन म्हणून गणल्या जातात. या वयात त्यांना पुरेसे लैंगिक ज्ञान अवगत झालेले नसते. कुटुंब नियोजन, गर्भधारणा, गर्भारपणात घ्यावयाची काळजी यासारख्या विषयांची त्यांना कुठलीच जाण नसते. यासह अल्पवयात गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी सक्षम नसलेले शरीर, घरातील कामाचा ताण आणि त्यातच अपुरे पोषण या सर्व बाबींचे परिणाम अल्पवयीन मातेसोबतच जन्माला येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही जाणवतात. त्यामुळेच लग्नाच्या वेळी वधूचे वय किमान १८ आणि वराचे वय २१ पेक्षा कमी असू नये, अशी तरतूद बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ मध्ये करण्यात आलेली आहे. असे असताना कुठलाच सारासार विचार न करता किंवा अजाणतेपणामुळे अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे.
..............................
कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात रोखले १२ बालविवाह
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात एकीकडे नागरिकांची होणारी गर्दी टाळण्याकरिता लग्नसमारंभाला शासनाने परवानगी नाकारली होती. दुसरीकडे मात्र कोरोनाच्या आठ महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बालविवाह झाल्याचे प्रकार घडले. त्यातील १२ विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश मिळाले आहे.
.........................
जिल्ह्यात ७०० बालसंरक्षक समित्या पाहतात काम
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हास्तरावर महिला व बालविकास विभाग, तालुकास्तरावर महिला बालकल्याण; तर गावपातळीवर ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने नेमले आहेत. यासह जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. गावपातळीवर ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा सेविकांकडून मात्र जबाबदारी चोखपणे पार पाडली जात नसल्याने बालविवाहांना आळा बसणे अशक्य झाले आहे.
......................
बालविवाह कायदा काय आहे?
विवाह करण्यासाठी मुलीचे वय किमान १८ वर्षे; तर मुलाचे वय किमान २१ वर्षे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने २००६ मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार केला. १८ पेक्षा अधिक वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्याला दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व एक लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
......................
बालविवाहांची निश्चित आकडेवारी नाही
कोरोना काळात जिल्ह्यात १२ बालविवाह रोखण्यात आले; परंतु राज्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात किती बालविवाह झाले, हे मोजण्याची शास्त्रशुद्ध सुविधा अद्यापपर्यंत उभी झाली नसल्याने यंत्रणेकडे निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.
......................
७००
जिल्ह्यात बाल संरक्षक समित्या कार्यान्वित आहेत.
१२
बालविवाह कोरोना काळात रोखले
.....................
अल्पवयीन मुले शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहावे, त्यांचे भावी आयुष्य सुखकर व्हावे, यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे; मात्र तो आजही अनेक ठिकाणी केला जातो. गावपातळीवर ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासमक्ष हा प्रकार घडूनही तो रोखला जात नाही, हेच दुर्दैव आहे. लग्नपत्रिका छापणाऱ्यांनी, लग्न लावणारे भटजी, भन्ते, काजी यांनी वधू-वराचे वय लग्नायोग्य झाल्याचा पुरावा मागायला हवा; परंतु असे काहीच होत नसल्यानेच हा प्रकार थांबणे अशक्य झाले आहे.
- सुभाष राठोड, महिला व बालविकास अधिकारी, वाशिम