वाढत्या महागाईने फोडला सर्वसामान्यांना ‘घामटा’
By admin | Published: July 5, 2014 10:51 PM2014-07-05T22:51:07+5:302014-07-05T23:50:42+5:30
गृहिणींची बजेट कोलमडले, पेट्रोल, डिझेल, साखर महागली
वाशिम : सर्व सामान्यांच्या प्राथमिक गरजापुर्तीसाठी केंद्र सरकारचे आर्थिक बजेट अत्यंत महत्वाचे असते. साधारणत: बजेट नंतर महागाईतील चढउतार दिसून येतात. परंतु यंदा बजेटपूर्वीच पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती स्वयंपाकाचा गॅसही महागाईच्या उंबरठय़ापर्यंत येऊन पोहोचला आहे. दळणवळणाचा खर्च वाढल्यामुळे स्वाभाविकच महागाईचे आगडोंब फोफावले आहे. दिवसागणिक वाढणार्या या महागाईचे चटके सर्वसामान्यांना असह्य झाले असुन गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, नागरिकांमधून नाराजीचा सुर निघु लागला आहे.
** बजेटच्या आधीच रेल्वेची १४ टक्के भाडेवाढ , पेट्रोलच्या दरात १ रूपया ६९ पैसे तर डिझेलच्या दरात ५0 पैश्यांची वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम मूलभुत गरजांवर झाला असुन यातूनच महागाईने डोकेवर काढल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
** भाजीपाल्यापाठोपाठ धान्यांच्या दरातही वाढ झाली आहे. साखरेच्या दर प्रतिकिलो ३ रूपयांनी वाढले आहेत. इंधनात झालेली दरवाढच याला कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे.
** जिल्ह्यातून पाऊस हरविल्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत.अश्यातच महागाईचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले आहे. आता तर घरगुती स्वयंपाकाचा गॅस २५0 रूपयांनी महागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येणारा काळ सामान्यांसाठी अडचणीचा जाणार आहे.