शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न चिघळण्याचे संकेत! आता मानोरावासियांचे साखळी उपोषण
By संतोष वानखडे | Published: August 28, 2023 04:32 PM2023-08-28T16:32:48+5:302023-08-28T16:38:07+5:30
आता मानोरा येथे जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्ट रोजी मानोरावासियांनी साखळी उपोषण सुरू केले...
वाशिम : वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेवरून जिल्ह्यात राजकारण पेटत असल्याचे दिसून येते. चिवरा (ता.मालेगाव) येथील प्रस्तावित जागा कायम ठेवण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन झाले होते. आता मानोरा येथे जागा निश्चित करण्याच्या मागणीसाठी २८ ऑगस्ट रोजी मानोरावासियांनी साखळी उपोषण सुरू केले.
राज्यातील वाशिमसह ९ जिल्ह्यांत १०० विद्यार्थी क्षमतेची नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याला शासनाची मंजूरी मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील गट क्रमांक २३८ मधील १५.३९ हे. आर,, गट क्रमांक २८२ मधील ८.९९ हे. आर. आणि गट क्रमांक २८४ मधील ६.५३ हे. आर. मिळून एकूण ३०.९१ हे. आर. (७७.०० एकर) ई-क्लास जमिन प्रस्तावित करण्यात आली. चिवरा येथील जागा बदलून अन्य ठिकाणचे प्रस्तावदेखील राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेवरून ‘राजकारण’ रंगत आहे.
चिवरा येथील प्रस्तावित जागा कायम ठेवण्यात यावी, वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र हलविण्यात येवू नये या प्रमुख मागणीसाठी चिवरा येथील नागरिकांनी २२ ऑगस्ट रोजी झोडगा फाट्यावर रास्का रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या सहा दिवसानंतर मानोरा तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरीता मानोरा तालुका विकास कृती समितीने साखळी उपोषणाची हाक दिली. २८ ऑगस्टपासून कृती समितीचे पदाधिकारी मानोरा येथे साखळी उपोषणाला बसले. या आंदोलनास मानोरा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतने पाठींबा म्हणून ग्रामपंचायतचे ठराव दिले आहेत.