काँग्रेसच्या जिल्हा, तालुका कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:38 AM2021-08-29T04:38:58+5:302021-08-29T04:38:58+5:30

संतोष वानखडे वाशिम : अखिल भारतीय काँग्रेसच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी आमदार अमित झनक यांची वर्णी लागल्यानंतर आता जिल्हा व तालुका ...

Indications of reshuffle in Congress district and taluka executive! | काँग्रेसच्या जिल्हा, तालुका कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत!

काँग्रेसच्या जिल्हा, तालुका कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत!

Next

संतोष वानखडे

वाशिम : अखिल भारतीय काँग्रेसच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी आमदार अमित झनक यांची वर्णी लागल्यानंतर आता जिल्हा व तालुका कार्यकारिणीत आमूलाग्र फेरबदल होण्याचे संकेत असून, याबाबत युवावर्गाला कमालीची उत्सुकता लागली आहे.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामीण) निवडणुकीत २०१५ पर्यंत काँग्रेस पक्ष हा नंबर एकवर राहिलेला पक्ष आहे. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसच काँग्रेसला हरवू शकते, असे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्येच दबक्या आवाजात बोलले जाते. गाव ते राज्य या सर्वच स्तरावर पक्षाला उभारी देण्यासाठी काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर वाशिमसह अन्य काही ठिकाणी नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली. वाशिम जिल्हाध्यक्षपदी आमदार तथा युवा नेतृत्व अमित झनक यांची वर्णी लागल्यानंतर युवावर्गात अधिकच उत्साह दिसून येत आहे. आता काँग्रेसच्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीतदेखील फेरबदलाचे संकेत असून यामध्ये प्रादेशिक, वयोगट, जातीनिहाय समतोल साधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पक्षांतर्गतच्या गटबाजीला फाटा देत पक्षाला उभारी देणारे, दांडगा जनसंपर्क असणारे, अभ्यासू सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना या कार्यकारिणीत स्थान मिळणार असल्याचेही विश्वसनीय सूत्र आहे. जिल्हा व तालुका कार्यकारिणीत नेमके काय फेरबदल होणार, कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

०००००००

आगामी नगर परिषद निवडणुकांवर डोळा!

आगामी निवडणुका लक्षात घेता वरिष्ठ स्तरावरून काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव व मानोरा नगर पंचायत अशा पाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. मालेगावचा अपवाद वगळता उर्वरित चारही ठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही. नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नगर परिषद, नगर पंचायतीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

......

कोट

वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हा व तालुका कार्यकारिणीत बदल केले जातील. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष असून, लोकांचा या पक्षावर विश्वास आहे. पक्षश्रेष्ठीने माझ्या माध्यमातून युवावर्गाला संधी दिली आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवकांची साथ या बळावर काँग्रेस पक्ष हा गावोगावी अधिक गतीने व सक्षमपणे कसा पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न करणार.

- अमित झनक, आमदार तथा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस

Web Title: Indications of reshuffle in Congress district and taluka executive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.