वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी ‘झटका मशीन’चे देशी जुगाड

By नंदकिशोर नारे | Published: October 26, 2023 03:41 PM2023-10-26T15:41:25+5:302023-10-26T15:42:10+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वापरावर भर : रब्बीसाठी नियोजन

Indigenous Jugad of 'Jatka Machine' for crop protection from wild animals | वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी ‘झटका मशीन’चे देशी जुगाड

वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी ‘झटका मशीन’चे देशी जुगाड

नंदकिशाेर नारे

वाशिम : वन्यप्राण्यांचा उपद्रव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यावर नियंत्रणासाठी रब्बी हंगामात ‘झटका मशीन’ या यंत्राचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर वाढत आहे. या माध्यमातून, वन्यप्राणी दुरून डोलणारे पीक पाहत राहील. पण पिकांना त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान पोहोचत नाही.

भटक्या जनावरांसह नीलगाय किंवा रानडुकरे, हरीण, माकडांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करत असल्याने देशभरातील शेतकरी त्रस्त आहेत. या वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकरी कडाक्याची थंडी आणि कडक उन्हात भर दुपारी शेतात थांबून पहारा देतात. मात्र त्यानंतरही संधी मिळताच वन्यप्राणी पिकांवर ताव मारतात. यावर नियंत्रणासाठी कृषी शास्त्रज्ञांनी ‘झटका मशीन’ विकसित केले आहे. या यंत्रामुळे वन्यप्राण्यांना इजा न होता पीक सुरक्षित ठेवता येते. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामातील पिकांवर वन्यप्राण्यांचा ताव अधिक असतो. ही बाब लक्षात घेत शेतकरी ‘झटका मशीन’च्या वापरावर भर देत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

काय आहे ‘झटका मशीन’

‘झटका मशीन’ पारंपरिक विजेसह सौर ऊर्जेवर चार्ज करण्यायोग्य आहे. त्याला पॉवर बॅटरी जोडलेली असते. मशिनच्या मागून दोन तारा बाहेर येतात, ज्या शेताच्या आजूबाजूला तारेला जोडलेल्या असतात. एका मशिनने सुमारे २० ते ४० एकर पिकाचे संरक्षण करता येते.

तारेला स्पर्श होताच वन्यप्राणी पळतो दूर

वन्यप्राणी शेतात शिरला आणि शेताच्या धुऱ्यावरील ‘झटका मशीन’च्या वायरच्या संपर्कात येताच त्याला शॉक बसतो आणि तो लगेच शेतातून पळून जातो आणि पुन्हा त्या शेतात जाण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे पिकाचे संरक्षण होऊन शेतकऱ्यांची कटकट आणि नुकसानही बव्हंशी थांबते.


प्रत्येक हंगामात वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो. पोटापाण्यासाठी ऑटोरिक्षा चालवून ठोक्याने शेती करतो. अशात रखवाली करणे कठीण जाते. त्यामुळे या मशीनचा वापर करावा लागतो. यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला धोकाही नसतो.
- सतीश गावंडे,शेतकरी,

Web Title: Indigenous Jugad of 'Jatka Machine' for crop protection from wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.