औद्योगिक वसाहतीचे काम थंड बस्त्यात !
By admin | Published: August 25, 2015 02:29 AM2015-08-25T02:29:33+5:302015-08-25T02:29:33+5:30
मंगरुळपीर औद्योगिक वसाहत ओसाडच.
मंगरुळपीर : औद्योगिकीकरणाला चालना मिळून तालुक्यातील बेरोगजार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मंगरुळपीर- मानोरा मार्गावर शहराबाहेर औद्योगिक वसाहतीसाठी जागा राखीव करण्यात आली; परंतु गेली अनेक वर्षे ही वसाहत ओसाडच असून, तेथे कुठलाही उद्योग सुरू झालेला नाही. मंगरुळपीर तालुक्यात बहुतांश वर्ग हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. या भागात पारंपरिक पिकासोबत फळ लागवडसुद्धा योग्य प्रमाणात केली जाते; मात्र यावर पूर्वी प्रक्रिया उद्योग उभारण्यात यावा, या दृष्टीने या तालुक्यात अनेक वर्षापूर्वी एम.आय.डी.सी. स्थापना झाली. या ठिकाणी औद्योगिकीकरण करण्याच्या दृष्टीने भूखंड खरेदी करण्यात आले. याशिवाय यामध्ये अंतर्गत रस्ते पाण्याची टाकी व पुलांची निर्मिती करण्यात आली; मात्र कालांतराने या ठिकाणी कुठलाच उद्योग उभारण्यात आला नाही. त्यामुळे रस्ते अदृश्य झाले, तर पाण्याची टाकी क्षतिग्रस्त व पुलाचे बांधकाम उखडले आहे. या ठिकाणी भव्य स्वरूपात औद्योगिकीकरण झाले असते, तर या भागातील रोजगारांच्या रोजगारांची संधी उपलब्ध झाली असती. आता मात्र या भागातील जनतेला रोजगारासाठी महानगराकडे धाव घ्यावी लागत आहे. या परिसरात औद्योगिकीकरण व्हावे , अशी अपेक्षा बेरोजगार व्यक्त करीत आहेत. गेल्या चार-पाच महिन्यापूर्वी औद्योगिकीकरणासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी वाशीम येथे बैठक बोलावून या बैठकीत या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली; मात्र त्या नतंर काय झाले, हे समजू शकले नाही.