अर्भक मृत्यूचे प्रमाण घटले
By admin | Published: September 17, 2014 01:20 AM2014-09-17T01:20:45+5:302014-09-17T01:20:45+5:30
आशा ठरल्यात देवदूत : रूग्णालयातील प्रसूती संख्येत वाढ
जगदीश राठोड / मानोरा
गर्भवती महिला आणि नवजात अर्भकांसाठी आशा सेविका देवदूत ठरत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात दिसत आहे. आशा सेविका घरोघरी जाऊन गर्भवती माताची नोंद करतात आणि आरोग्य केंद्रातच प्रसूती करून घेण्यासाठी गर्भवती मातांना प्रवृत्त करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात घरीच करण्यात येणार्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाले असून, तालुक्यातील आरोग्य केंद्रांत प्रसुतीचे प्रमाण वाढल्यामुळे प्रसुतीदरम्यान नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा आरोग्य अधिकार्यांनी केला आहे.
पूर्वी ग्रामीण भागात रूग्णालयाऐवजी गर्भवती महिलांची घरीच प्रसूती करण्याकडे कल होता. त्यामुळे जन्माला येणार्या कित्येक बालकांना गावामधील अपुर्या सोयी सुविधाअभावी उपचार मिळत नव्हते. परिणामी नवजात अर्भक मृत्यूमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. आता गत काही वर्षापासून आशा सेविकांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. आदिवासी ग्रामीण कुटुंबातील गरोदर महिलांची माहिती घेऊन नोंदी करण्याची जबाबदारी या आशा सेविकांवर सोपविण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचे शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ह्यकीटह्ण वापरण्यात येतात. त्यामुळे बालकांना आरोग्य सुविधा मिळतात व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. मानोरा तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्राव्यतिरिक्त २४ उपकेंद्राची स्थापना केली आहे. या सर्व केंद्रातून प्रसूतीची व्यवस्था केली आहे. आशा सेविका, दाई बैठका, भरारी पथक, जननी सुरक्षाद्वारे नवजात अर्भक मृत्यू घटविण्यात यश आले आहे. यासाठी आशा वर्कर घरोघरी जाऊन गरोदर मातेला आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी प्रवृत्त केल्यामुळे शक्य झाले आहे. मानोरा तालुक्यातील ११३ गावात आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहे.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी यांनी जननी सुरक्षा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगीतले. मानव विकास मिशन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रावर गरोदर मातांना सेवा मिळत असल्याने घरी प्रसूती होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मानव विकास मिशन अंतर्गत आठ महिन्याच्या गरोदर मातास २00 रूपये आणि प्रसूतीनंतर २000 रूपये मदत मिळते. त्यामुळे त्यांना काळजी घेण्यास मदत होते. आता जवळपास ९0 टक्के प्रसूती दवाखान्यात होत असल्याचे त्यांनी सांगीतले.