घरपोच बियाणे, खते देण्याचा कृषी विभागाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:11 PM2020-05-03T16:11:11+5:302020-05-03T16:11:25+5:30
घरपोच खते, बियाणे देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : खरीप हंगामात खते, बियाणे खरेदीसंदर्भात शेतकºयांची गैरसोय होऊ नये तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांची कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शासनाच्या संकेतस्थळावर मागणी नोंदविल्यास घरपोच खते, बियाणे देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांनी अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शशिकरण जांभरूणकर यांनी केले.
खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकºयांतर्फे शेती मशागतीची कामे केली जात आहे. काही दिवसातच खरीप पीक पेरणी सुरू होण्याचे संकेत लक्षात घेता शेतकºयांची खते, बियाण्यांसाठी जुळवाजूळव सुरू झाल्याचे दिसून येते. दरम्यान, शेतकºयांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी नवीन बॅगचे बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. मागच्या वर्षीचे सोयाबीन उगवण शक्ती तपासून पेरता येते. उगवण शक्ती ७० टक्के असल्यास ३० किलो बियाणे एकरी वापरावे व ६५ टक्के उगवण असल्यास ३५ किलो बियाणे एकरी वापरावे, उगवण शक्ती कशी तपासावी याबाबत आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी मित्र तसेच प्रगतशील शेतकरी यांच्याद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम खरीप हंगामपूर्वी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी जांभरूणकर यांनी सांगितले. बियाण्याची उगवण शक्ती तपासण्याबाबतअडचण, शंका असल्यास आपल्या गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधा. तसेच कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी बाजारात येण्याचे टाळा, आपणास लागणाº्या बियाणे, खताची मागणी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदविल्यास आपणास घरपोच बियाणे व खते रास्त दरामध्ये आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रा मार्फत पोहचविल्या जातील. खते व बियाणेची मागणी कशी करावी यासाठी कृषी सहायक, कृषी मित्र, प्रगतशील शेतकरी यांची मदत घ्यावी, असे जांभरूणकर यांनी सांगितले.