शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा ह्रदयविकाराने मृत्यू, जिल्हा कारागृहातील घटना
By सुनील काकडे | Published: October 28, 2022 07:34 PM2022-10-28T19:34:59+5:302022-10-28T19:35:40+5:30
प्राप्त माहितीनुसार, एप्रिल २०२२ या महिन्यात विनोद तायडेला स्थानबद्ध करून वाशिमच्या जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले. तेव्हापासून तो याठिकाणी शिक्षा भोगत होता.
वाशिम : ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध विनोद गणेशराव तायडे (४५, चांदूरबाजार, जि.अमरावती) या आरोपीचा गुरूवार, २७ ऑक्टोबर रोजी ह्रदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना जिल्हा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मधील बरॅक क्रमांक १ मध्ये घडली.
प्राप्त माहितीनुसार, एप्रिल २०२२ या महिन्यात विनोद तायडेला स्थानबद्ध करून वाशिमच्या जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले. तेव्हापासून तो याठिकाणी शिक्षा भोगत होता. यादरम्यान २७ ऑक्टोबर रोजी अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना व्हायला लागल्या. यावेळी बरॅकमध्ये असलेल्या सुमारे ६० कैद्यांनी कारागृह प्रशासनाला वृत्त कळविले. कर्मचाऱ्यांनीही कुठलाच विलंब न करता विनोदला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयात विनोदची प्राणज्योत माळवली. त्याचा मृतदेह कुटूंबियाच्या स्वाधीन करण्यात आला, अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक प्रदिप इंगळे यांनी दिली.