अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:41+5:302021-09-02T05:30:41+5:30
मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुकांडा शिवारातील शेतात मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांमधील विजेच्या धक्क्याने चार रोहींचा मृत्यू झाल्याची ...
मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सुकांडा शिवारातील शेतात मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांमधील विजेच्या धक्क्याने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याबाबतचा अहवाल पशुवैद्यकीय चिकित्सकांनी वन अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर चारही रोहींचा मृत्यू हा विजेच्या धक्क्यानेच झाल्याची बाब सिद्ध झाली.
रोहींच्या मृत्यूस वीज वितरण कंपनीचे स्थानिक वायरमन, कनिष्ठ अभियंत्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे मानून वन विभागाने संबंधितांविरूद्ध भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम २ (१६), २ (३५), ९, ३९ (३) क ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर स्थानिक वायरमनसह मेडशी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता देसले यांचे बयाण नोंदविल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता जीवनानी यांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
..............................
कोट :
सुकांडा शिवारातील शेतात चार रोहींचा विजेचा धक्का लागू मृत्यू झाल्याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
- सारंग नाईक
निरीक्षक, वीज वितरण कंपनी