सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:15+5:302021-07-23T04:25:15+5:30
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. अशातच मागील आठवड्यात पावसास सुरुवात ...
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. अशातच मागील आठवड्यात पावसास सुरुवात झाली असून, रिमझिम पाऊस आणि सतत ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर ताबेंरा, पानावरील ठिपके यासारख्या बुरशीजन्य रोगांचा, तसेच पाने खाणाऱ्या अळीचा, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकऱ्यांनी या पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
हिरवी अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी सर्वेक्षणाकरिता प्रति हेक्टरी हिरवी अळीसाठी ५ व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी पाच कामगंध सापळे शेतामध्येत लावावेत. तसेच इंग्रजी ‘टी’ आकाराचे हेक्टरी १० ते १५ पक्षी थांबे शेतात लावावेत. पेरणीनंतर २५ दिवसांपर्यंत ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. निरीक्षणे घेण्याकरिता हेक्टरी ५ कामगंध सापळे लावून नियमित निरीक्षणे घ्यावीत व आर्थिक नुकसान पातळीच्यावर किडीची संख्या आढळल्यास तत्काळ शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्लाही तोटावार यांनी दिला. चक्रीभुंगा प्रति मीटर ३ ते ४ अळ्या, खोडमाशी १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे, हिरवी उंट अळी ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत, स्पोडोप्टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी) ३ ते ४ अळ्या प्रति मीटर ओळीत यापेक्षा जास्त आढळल्यास नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. त्यानंतर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल ई विषाणूची २ मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमोरिया रिलाई या बुरुशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. रासायनिक घटकांची फवारणी करत असताना शेतकरीबंधूंनी सर्व सुरक्षा विषयक किटचा वापर करावा, असे आवाहनही तोटावार यांनी केले.
००००००००
फळझाडावर गोगलगायीचा प्रादुर्भाव
काही भागांत सोयाबीन तसेच इतर संत्रावर्गीय फळझाडांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गोगलगाय हा मृदकाय व उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या शरीरावर कवच असते, यालाच शंख म्हणतात. गोगलगायीचे नियंत्रण मोहीम स्वरूपात सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी करणे अपेक्षित आहे. नियंत्रणाकरिता मशागतीय पद्धत, रासायनिक पध्दत, जैविक पद्धतीचा अवलंब करावा. गोगलगायी मुख्यतः रात्रीच्या वेळी कोवळे पाने, कंद फळे यांना छिद्र पाडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा उपद्रव टाळण्यासाठी शेताभोवती दोन मीटर रुंदीच्या पट्ट्या राख पसरावी व त्यावर मोरचूद व कळीचा चुना २ : ३ प्रमाणात मिसळून त्याचा थर राखेवर द्यावा. अशा ठिकाणी गोगलगाय येत नाही.