विभागीय आयुक्तांकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:42 AM2021-04-24T04:42:17+5:302021-04-24T04:42:17+5:30
वाशिम : विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २३ एप्रिल रोजी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग) परिसरात उभारण्यात ...
वाशिम : विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी २३ एप्रिल रोजी जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग) परिसरात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. हा प्रकल्प येत्या दोन दिवसांत कार्यान्वित होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर व संदीप महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये ५० आयसीयू बेड आणि १५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आणखी ७५ बेडची वाढ येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी, यासाठी स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पातून दर मिनिटाला २०० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या प्रगतीबाबतची माहिती संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली. तसेच येत्या दोन दिवसांत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश सिंह यांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिले.