नियोजित कोविड केअर सेंटरची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:33+5:302021-05-08T04:43:33+5:30
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तालुका स्तरावर कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध केली जात आहे. मानोरा तालुका स्तरावर कोविड केअर ...
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तालुका स्तरावर कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध केली जात आहे. मानोरा तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यविषयक निदान महामारीच्या कालावधीत तालुक्यातच कोविड केअर सेंटर व्हावे, यासाठी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व जिल्ह्यातील बड्या लोकप्रतिनिधींनीही मागणी केली. यासंदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या सर्वांचा परिपाक म्हणून मानोरा शहराला लागून असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान जी.प. सदस्य अरविंद पाटील इंगोले हे अध्यक्ष असलेल्या मातोश्री सुभद्राबाई पाटील विद्यालयाच्या सुसज्ज इमारतीमध्ये २७ बेडचे कोविड सेंटर तातडीने सुरू करण्यात येणार आहे. अरविंद पाटील इंगोले यांनी तालुक्यातील नागरिकांच्या उपचारासाठी विनामोबदला महाविद्यालयाची इमारत प्रशासनाला देऊ केली आहे. नियोजित कोविड सेंटरची पाहणी करण्याकरिता जि. प. वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी मानोरा तहसीलदार जाधव, संवर्ग विकास अधिकारी श्रीमती वाघमारे, न.प. मुख्याधिकारी नीलेश गायकवाड, नायब तहसीलदार किर्दक, तालुका आरोग्य विभागाचे डॉ. मानके, गटशिक्षण अधिकारी पवार हे व इतरही विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील घरकुल आणि विविध विकास कामांचा आढावाही पं. स. कार्यालयामध्ये विभाग प्रमुखांकडून घेतला.