‘सीबीनॅट’ मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णांची तपासणी
By admin | Published: March 24, 2017 02:26 AM2017-03-24T02:26:39+5:302017-03-24T02:26:39+5:30
जागतिक क्षयरोग दिन विशेष; राज्यात ७१ मशीन कार्यान्वित.
वाशिम, दि. २३- सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्राप्त झालेल्या सीबीनॅट (काटिर्र्ज बेस न्युक्लिक अँसिड अँम्प्लीफिकेशन टेस्ट) यंत्राद्वारे आता संशयित क्षयरुग्णांची तपासणी सुलभ झाली आहे. राज्यात ७१ सीबीनॅट मशीन असून, ऑगस्ट २0१६ ते फेब्रुवारी २0१७ या कालावधीत जवळपास ४0 हजारावर संशयितांची तपासणी करण्यात आली.
क्षयरुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे आणि क्षयरुग्णांवर दैनंदिन पद्धतीने उपचार सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अमलात आणलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात ७१ ठिकाणी सीबीनॅट यंत्र पुरविण्यात आले. या यंत्राच्या सहाय्याने एचआयव्ही बाधित संशयित रुग्णांची थुंकी व फुप्फुसेतर क्षयरोग नमुने निदानाकरिता तपासले जातात. संशयित बाल क्षयरुग्णांचे थुंकी नमुनेदेखील सीबीनॅट यंत्राद्वारे तपासले जातात. यापूर्वी हे नमुने सूक्ष्मदर्शकाद्वारे प्रयोगशाळेत तपासले जात होते. संशयित क्षयरुग्णांचे फुप्फुसाव्यतिरिक्त अन्य नमुनेदेखील या यंत्राद्वारे तपासले जातात.
वाशिम येथे यापूर्वी ही सुविधा उपलब्ध नसल्याने सर्व नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवावे लागत होते. यामध्ये वेळेचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत होता. सीबीनॅट यंत्रामुळे एकाच दिवशी संशयिताची तपासणी व रिपोर्ट संबंधित रुग्णांना मोफत दिला जातो. वाशिम जिल्हय़ात ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत २८१ संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १६ रुग्ण ह्यएमडीआरह्ण (मल्टी ड्रग्ज रजिस्टंट-क्षयरोगाच्या प्रथम श्रेणीतील औषधांना दाद न देणारे) आढळून आले तर ५९ रुग्ण क्षयाच्या पहिल्या टप्प्यातील असल्याचे निदान झाले. उर्वरित संशयित सर्वसाधारण अवस्थेतील असल्याचे स्पष्ट झाले.
वाशिम जिल्हय़ात १,२७७ क्षयरुग्ण
एप्रिल २0१६ ते फेब्रुवारी २0१७ या कालावधीत वाशिम जिल्हय़ात सरकारी रुग्णालयांत ९४७ तर खासगी रुग्णालयात ३३0 असे एकूण १,१७७ क्षयरुग्ण उपचार घेत आहेत.
सीबीनॅट' मशीन येण्यापूर्वी वाशिम जिल्हय़ातील संशयित रुग्णांचे तपासणी नमुने नागपूरला पाठवावे लागत होते. यामध्ये वेळेचा अपव्यय होत असे. ऑगस्ट २0१६ मध्ये वाशिम येथे सीबीनॅट मशीन प्राप्त झाले असून, संशयितांची मोफत तपासणी केली जाते. आतापर्यंंत २८१ संशयितांची तपासणी करण्यात आली. एकाच दिवसात तपासणी केल्यानंतर रिपोर्ट दिला जातो.
- डॉ. सुधाकर जिरोणकर
जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम.