वाशिम जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:17 AM2020-07-25T11:17:17+5:302020-07-25T11:17:34+5:30
कृषी विभागाकडून आपले सरकार सेवा केंद्रांच्या तपासणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.
वाशिम: पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांकडून विमारकमेशिवाय कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा सुचना देण्यासह दर्शनी भागांत माहिती फलक लावण्याच्या सुचना कृषी विभागाने आपले सरकार सेवा केंद्रांना प्रत्यक्ष पाहणी करून दिल्या होत्या. त्यानंतरही आपले सरकार सेवा केंद्रांवर पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांकडून कागदपत्रांचे पैसे तसेच ईतर अतिरिक्त शुल्क आकारुन अवैध वसुली केली जात होती. लोकमतने १९ जुलै रोजी या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाकडून आपले सरकार सेवा केंद्रांच्या तपासणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली असून, या योजनेंतर्गत शेतकºयांकडून १ जुलैपासूनच पीकविमा भरून घेतला जात आहे. शेतकºयांना नजिक चे आपले सरकार सेवा केंद्र, किंवा सेतू केंद्र संबंधित बँक, सेवासोसायटीत पीकविमा काढता येतो. या योजनेची मुदत संपत असताना शेतकरी पीकविमा काढण्याची घाई करीत आहेत. तथापि, पीकविमा काढण्यासाठी पीकविमा रकमेशिवाय कोणतेही शुल्क देण्याची गरज नसतानाही शेतकºयांकडून काही केंद्रांत अवैध वसुली केली जात असल्याचे, तसेच शेतकºयांना माहितीसाठी दर्शनी भागांत फलक लावले नसल्याचा प्रकार पाहायला मिळत होता. शिवाय डिजिटल सातबारासाठी ५० रुपये, तर परिश्रम म्हणून १५ ते २० रुपयांसह १०० रुयांपर्यत शेतकºयांकडून वसुली केली जात होती. लोकमतने या संदर्भात १९ जुलै रोजीच्या अंकात ‘पीकविमा काढणाºया जिल्ह्यातील शेतकºयांकडून अवैध वसुली!’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल कृषी विभागाने घेत आपले सरकार सेवा केंद्राची पुन्हा तपासणी सुरू केली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाºयांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
फलक न लावल्यास कारवाई
प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकºयांना आवश्यक आणि अचूक माहिती देण्यासह विमा रकमेशिवाय कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचा उल्लेख असलेले फलक प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रावर दर्शनी भागात लावण्याची सक्ती कृषी विभागाच्या पथकाने केली आहे. सहाही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाºयांस उपविभागीय कृषी अधिकाºयांकडून याची पडताळणीही केली जाणार आहे. त्यात दिरंगाई करणाºया आपले सरकार सेवा केंद्र चालकावर नियमानुसार कारवाईसुद्धा केली जाणार असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.
पीकविमा भरण्याची मुदत आता जवळ येत आहे. शेतकºयांची गैरसोय होऊ नये, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपले सरकार सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.
- शंकरराव तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम