शाळा तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश!
By संतोष वानखडे | Published: September 4, 2023 05:25 PM2023-09-04T17:25:28+5:302023-09-04T17:26:13+5:30
सभेच्या सुरुवातीला सदस्य आर.के. राठोड यांनी विठोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला.
वाशिम : शिक्षण विभागाच्या दोन समित्यांनी जिल्ह्यात राबविलेल्या शाळा तपासणी मोहिमेचा सविस्तर अहवाल येत्या सात दिवसात सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत दिले.
स्व.वसंतराव नाईक सभागृहात सोमवारी दुपारी १ वाजता सुरु झालेल्या स्थायी समिती सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी उपाध्यक्ष चक्रधर गोटे, सभापती सर्वश्री सुरेश मापारी, अशोक डोंगरदिवे, वैशाली प्रमोद लळे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांची मंचावर उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीला सदस्य आर.के. राठोड यांनी विठोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हे विठोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिकले असून, याच शाळेत सद्यस्थितीत भौतिक सुविधांचा अभाव असल्याने ही शोकांतिका असल्याचे राठोड म्हणाले. यावर या शाळेच्या विकासासाठी सभागृहातच ५० लाखांचा निधी देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता; मात्र तेव्हा कोणीच का बोलले नाही?, असे प्रत्युत्तर उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती चक्रधर गोटे यांनी दिले. या शाळेबद्दल आम्हालाही तळमळ असून सभागृहाने पुरेसा निधी उपलब्ध करण्याला मंजूरी दिली तर निश्चितच या शाळेत विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करता येतील, अशी ग्वाहीही गोटे यांनी दिली.
राज्य शासनाने थोर महापुरूष, थोर नेते ज्या शाळेत शिकले, त्या शाळांचा विकास करण्यासाठी स्मारक म्हणून यादी जाहिर केली. यामध्ये राज्यातील नऊ शाळांचा समावेश असून, विठोली (ता.मानोरा) येथील शाळेचाही या यादीत समावेश व्हावा याकरीता शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. शाळा तपासणीचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. शिक्षण विभागाकडून शाळा तपासणीसाठी दोन समित्या नियुक्त केल्या होत्या, या समित्यांचा तपासणी अहवाल येत्या सात दिवसात सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले. या सभेत अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहार, सिंचन विहिरींचे प्रलंबित प्रस्ताव, रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे यांसह अन्य विषयांवरही चर्चा झाली.