सर्व शाळा २७ जून रोजी सुरू करण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश
By admin | Published: June 7, 2017 07:07 PM2017-06-07T19:07:24+5:302017-06-07T19:07:24+5:30
मालेगाव : मालेगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सर्व शाळांना पत्र रवाना करीत २७ जूनला शाळा उघडण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसह खासगी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा एकाच दिवशी अर्थात २७ जूनपासून सुरू कराव्या अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघाने करताच, मालेगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सर्व शाळांना पत्र रवाना करीत २७ जूनला शाळा उघडण्याचे निर्देश दिले.
उच्च न्यायालयाचा ८ जून २००७ चा निर्णय तसेच २२ जून २००७ च्या शासन आदेशात स्पष्ट आहे की विदर्भातील सर्व शाळा या एकच दिवशी २६ जून ला उघडण्यात याव्या. असे असले तरी मालेगाव तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. इंग्रजी मध्यमाच्या शाळा या जून महिन्यातील कोणत्याही तारखेपासून भरविण्यात येत आहेत. कोणती शाळा १० जूनला सुरू होते तर कोणती शाळा १५ जूनला सुरू होते. वेगवेगळ्या तारखेला शाळा सुरू होत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वेगवेगळ्या तारखेला शाळा सुरू होणे ही बाब उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याची बाब शिक्षक व मुख्याध्यापक संघाने ५ जून रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली होती. या पृष्ठभूमीवर गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी ७ जून रोजी सर्व शाळांना एक पत्र रवाना करून, शाळा २७ जून रोजी सुरू करण्याचे निर्देश दिले. २६ जूनपूर्वी कुणी शाळा सुरू केली तर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला म्हणून योग्य ती कार्यवाही करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला.