अग्निशमन यंत्रणेसंदर्भात रुग्णालयांची तपासणी करण्याचे निर्देश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 06:42 PM2021-01-12T18:42:16+5:302021-01-12T18:42:26+5:30
Washim News इलेक्ट्रिक आॅडीट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
वाशिम : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १२ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा तसेच इतर आवश्यक बाबींची तपासणी करीत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकारी व आरोग्य विभागाला दिले.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्र. कि. दांदळे, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्यासह मुख्याधिकारी, अग्निशमन अधिकाºयांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. रुग्णालयांच्या इमारतींमध्ये बिल्डींग कोडनुसार अग्निशमन यंत्रणा, इमर्जन्सी एक्झिट यासारख्या आवश्यक बाबी आहेत की नाही, यासंदर्भात नगरपरिषदेने कालबद्ध मोहीम राबवून तपासणी करावी. आरोग्य विभागाने सुद्धा जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी करून बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट अंतर्गत नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांसह उपलब्ध आवश्यक सुविधांची तपासणी करावी. नगरपरिषद व आरोग्य विभागाने यापुढे प्रत्येक वर्षी सहा-सहा महिन्याने अशाप्रकारे रुग्णालयांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच कर्मचाऱ्यांना याविषयी आवश्यक प्रशिक्षण द्यावे. वर्षातून किमान एकदा सर्व शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये येथे अग्निशमन यंत्रणेच्या वापराबाबत ‘मॉक ड्रील’ घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर आॅडीट व इलेक्ट्रिक आॅडीट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.