शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शो-कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 06:26 PM2019-02-28T18:26:09+5:302019-02-28T18:26:18+5:30
अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत दिले.
वाशिम : प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह समाजकल्याण विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत दिले. समाजकल्याण विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीस दिरंगाई, वित्तीय अनियमितता यासह कृषी, पंचायत, शिक्षण विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवर जिल्हा परिषद सदस्यांनी अधिका-यांना धारेवर धरले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या पीठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख तर मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, उस्मान गारवे यांनी समाजकल्याण विभागातील विविध योजनांमधील प्रशासकीय दिरंगाईबाबत संबंधित अधिका-यांना धारेवर धरले.
झेरॉक्स मशिन व अन्य काही योजनांचे प्रस्तावास दिरंगाई झाल्याचा जाब विचारला असता, सदर फाईल वित्त विभागात असल्याचे उत्तरे संबंधित अधिका-यांनी दिले. यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी जोशी यांना विचारणा केली असता, वित्त विभागाकडून दिरंगाई होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात संभ्रम निर्माण केल्याबद्दल तसेच दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश हर्षदा देशमुख यांनी दिले. समाजकल्याण अधिकारी हे वाशिमला नियमित येत नसल्याचा मुद्दा उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उपस्थित केला. समाजकल्याण अधिका-यांकडून यवतमाळ येथील प्रभार काढून पूर्णवेळ वाशिम येथेच ठेवण्यात यावे, असा ठराव यावेळी घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीवरून उस्मान गारवे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड आदींनी प्रश्न उपस्थित केला असता, २५०० पैकी ६५० विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बँक खात्याची दुरुस्ती करीत त्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याची माहिती अधिका-यांना दिली. समाजकल्याण विभागाने १० दिवसांपूर्वीदेखील हीच आकडेवारी सादर केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासकीय दिरंगाई करणारे गटशिक्षणाधिकारी तसेच समाजकल्याण विभागाच्या संबंधित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. यावेळी कृषी विभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, शासन परिपत्रक व निर्णयाचे वाचन, पाणीटंचाई, दुष्काळसृदश परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र ताथोड, चक्रधर गोटे, शंकरराव बोरकर, विकास गवळी, उस्मान गारवे, सचिन रोकडे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
आठ महिन्यांपासून चार कोटी रुपये पडून
शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचे चार कोटी रुपये गत आठ महिन्यांपासून बँकेत पडून असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे सदर चार कोटी रुपये हे चालू खात्यात असल्याने त्याचे व्याजही जिल्हा परिषदेला मिळू शकले नसल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्य व मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली. शिष्यवृत्ती योजनेसंदर्भातील रकमेबाबत समाजकल्याण विभागाने बँक अचानक का बदलण्यात आली, याचा जाब चक्रधर गोटे यांनी विचारला. कुणाच्या परवानगीने बँक खाते बदलण्यात आले असा सवाल विचारत याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिले.