शौचालय अनुदान देण्याचे निर्देश
By admin | Published: August 4, 2016 02:03 AM2016-08-04T02:03:14+5:302016-08-04T02:03:14+5:30
मानोरा तालुक्यातील २00 लाभार्थ्यांना २४ लाख रुपये अनुदान देण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिका-यांचे आदेश.
वाशिम,दि. ३- नगर पंचायत स्थापनेपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करणार्या मानोर्यातील २00 लाभार्थींना तातडीने २४ लाखांचे अनुदान वितरण करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी मानोरा गटविकास अधिकार्यांना मंगळवारी दिले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण करणार्या लाभार्थीला १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. मानोरा ग्रामपंचायत असताना, शहरातील २00 लाभार्थिंनी शौचालय बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर मानोरा नगर पंचायत अस्तित्वात आली. दरम्यान, शौचालय अनुदानाची रक्कम कुणी द्यावी? असा प्रश्न निर्माण झाला. नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने अनुदानाची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाने द्यावी, अशी भूमिका नगर पंचायत प्रशासनाने घेतली. जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. मानोरा ग्रामपंचायत असताना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने २00 लाभार्थींचे प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान याप्रमाणे २४ लाख रुपये जिल्हा परिषदेने द्यावे, अशी भूमिका हेमेंद्र ठाकरे यांनी सर्वसाधारण सभेत मांडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याशी चर्चेअंती २00 लाभार्थींसाठी २४ लाखांचे अनुदान दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आले. तथापि, अनुदान वितरणास दिरंगाई झाली. यासंदर्भात सोमवारी ठाकरे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याशी अनुदान दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. या पृष्ठभूमीवर संबंधित २00 लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करण्याचे निर्देश मानोरा गटविकास अधिकार्यांना देण्यात आले.