वाशिम जिल्ह्यात आणखी आठवडाभर उन्हाची तीव्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:56 PM2019-05-27T14:56:25+5:302019-05-27T14:56:57+5:30
वाशिम: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात उन्हाची तीव्रता आणखी ८ दिवस जाणवणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात उन्हाची तीव्रता आणखी ८ दिवस जाणवणार आहे. त्यात वाशिम जिल्ह्याचाही समावेश असून, सद्यस्थिती जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंशावर आहे.
मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी असून, राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. राज्यात किमान ८ जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्व पावसाची शक्यता नाही. अर्थात ८ जूननंतर मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ३१ मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील, परंतु १ जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने वाशिम जिल्ह्यातील जनतेला आणखी आठवडाभर उन्हाचे चटके सहन करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा परिणाम खरीपाच्या तयारीवरही काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तथापि, यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकºयांनी काळजी करण्याचे कारण नसून, शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून हवामान विभागााच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.