भाजपात अंतर्गत धुसफूस; वंचित आघाडीत इच्छूकांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 03:22 PM2019-07-08T15:22:24+5:302019-07-08T15:22:32+5:30
वंचित बहुजन आघाडीतून इच्छूकांची अनेक नावे समोर येत असल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.
- निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात होत नाही; तोच भाजपाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्याने अंतर्गत धुसफूस समोर आली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतून इच्छूकांची अनेक नावे समोर येत असल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.
पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मेडशी विधानसभा मतदारसंघ असताना, १९६७ ते १९९५ अशा एकूण सात निवडणुकीत काँग्रेसनेच विजय मिळविला.
१९९९ आणि २००४ मध्ये भाजपाचे अॅड. विजय जाधव हे विजयी झाले होते. २००९ मध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर सलग तीनही निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, इच्छूकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली. नेमके याच वेळी भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सानप यांच्यासह भाजपा ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदाराच्या कार्यपद्धतीवर आरोप करीत भाजपा जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सोपविले. सदर राजीनामे अद्याप मंजूर झाले नसले तरी या प्रकारामुळे शिस्तीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सदर प्रकरण भाजपाचे वरिष्ठ नेते नेमके कसे हाताळतात यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. सलग तीन निवडणुकीतील भाजपाचा पराभव आणि आता अंतर्गत धुसफूस पाहता या मतदारसंघावर दावा करण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहे. शिवसंग्रामनेही या मतदारसंघावर यापूर्वीच दावा केला आहे.
दुसरीकडे काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक तसेच माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे पूत्र अॅड. नकूल देशमुखही विधानसभेसाठी इच्छूक आहेत. काँग्रेसच्यावतीने झनकांनाच उमेदवारी दिल्यानंतर नकुल देशमुख कोणता पवित्रा घेणार, हे सध्यातरी सांगता येत नसले तरी अद्याप कोणत्याही पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचे राजकीय चर्चेवरून दिसून येते.
वंचित आघाडीही चर्चेत
रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीही चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडीला भाजपानंतर दुसºया क्रमांकाची मते होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जानकीराम डाखोरे, डॉ. गजानन हुले, किरणताई गिºहे, प्रा. प्रशांत गोळे, डॉ. प्रल्हाद कोकाटे यांच्यासह इतरही काही जण इच्छूक आहेत. विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मुरब्बी नेताही वंचित आघाडीच्या संपर्कात आहे. तिकिटासाठी दोन वेळा त्यांनी वरिष्ठांची भेटही घेतली.