वाशिम जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चा शिरकाव; १ रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट'
By सुनील काकडे | Published: September 8, 2023 05:43 PM2023-09-08T17:43:45+5:302023-09-08T17:43:56+5:30
गेल्या काही वर्षांत या आजाराने ग्रस्त रुग्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत.
वाशिम : जिल्ह्यातील कामरगाव (ता.कारंजा लाड) येथे लक्षणे दिसून येताच ६० वर्षीय इसमाचे नमुने १ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील ‘ऑल इंडिया मेडिकल इन्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या (एम्स) प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून संबंधित इसम ‘स्क्रब टायफास’ने बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुहास कोरे यांनी सांगितले की, ज्या भागात उंदीरांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे किंवा घनदाट गवताची ज्याठिकाणी उगवण होते, त्याठिकाणी प्रामुख्याने आढळणाऱ्या ‘माईट’ नामक किटकाच्या चावण्याने होणारा ‘स्क्रब टायफस’ हा आजार आपल्याकडे तसा दुर्मिळ आहे; मात्र गेल्या काही वर्षांत या आजाराने ग्रस्त रुग्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. वाशिम जिल्ह्यात प्रथमच कामरगाव येथे ६० वर्षीय इसमाला त्याची लागण झाल्याची बाब रक्त नमुने तपासणीअंती निष्पन्न झाली. संबंधित इसमावर योग्य उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे डाॅ. कोरे म्हणाले.