रोजगार हमी योजनेतील घोटाळ्याच्या चौकशीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:39 PM2019-08-02T13:39:53+5:302019-08-02T13:39:59+5:30
वृत्त ‘लोकमत’ने १ आॅगस्टच्या अंकात प्रकाशित करताच प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू केली.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रोहयोच्या कामांचे खोटे मस्टर तयार करणे, बोगस मजूर दाखवून त्यांचे परस्पर इलाहाबाद बँकेच्या वाशिम येथील शाखेत खाते काढणे आणि त्यातून आर्थिक व्यवहार करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सरपंच, सचिव, पंचायत समितीचे अधिकारी, बँक शाखा व्यवस्थापक आदिंविरूद्ध वाघळूद (ता.मालेगाव) येथील ७९ लोकांनी ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. त्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने १ आॅगस्टच्या अंकात प्रकाशित करताच प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू केली. यासाठी नेमलेल्या पथकाने चौकशी अहवाल पाच दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाघळूद ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा देशमुख यांच्यासह रोजगार सेवक, सचिव, मालेगाव पंचायत समितीमधील अधिकारी व इलाहाबाद बँकेचे शाखा व्यवस्थापक आदिंनी परस्पर संगणमताने अनेक गंभीर स्वरूपातील आर्थिक अपहार केल्याचे प्रकरण वाघळूद येथीलच काही जागरूक नागरिकांनी चव्हाट्यावर आणले. बँकेत खोटे खाते काढणे, रोहयोच्या कामाचे खोटे मस्टर तयार करून तथा त्यावर बोगस स्वाक्षऱ्या करून कोट्यवधी रुपये हडपण्यात आले. विशेष गंभीर बाब म्हणजे अनुसयाबाई देशमुख, रायाजी डोंगरदिवे, बाबाराव देशमुख या तीन मयत व्यक्तींसह शिवकुमार मस्के, अक्षरा मस्के, ओम देशमुख, नागेश देशमुख, योगेश देशमुख ही अल्पवयीन मुले व बाहेरगावी नोकरीला, शिकायला असलेल्या १६ लोकांनाही रोहयोच्या कामावर मजूर म्हणून दाखविण्यात आले. खूनाच्या आरोपात कारागृहात असलेल्या एका व्यक्तीच्या नावे देखील मस्टर काढल्याचा गंभीर आरोप वाघळूद येथील ७९ लोकांनी केला.
याप्रकरणी ‘लोकमत’ने १ आॅगस्टच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयोचे तहसीलदार, मालेगावचे तहसीलदार, रोहयोचे उपअभियंता, मंडळ अधिकारी, तलाठी आदिंचे स्वतंत्र पथक तयार करून चौकशीचे निर्देश दिले आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वाघळूद येथे झालेल्या सर्व कामांची तद्वतच गैरप्रकारांची चौकशी करून येत्या ५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाने पथकास दिले आहेत. याशिवाय वाघळूद येथील ग्रामसेवकाने त्यांचे संपूर्ण रेकॉर्ड २ आॅगस्टच्या दुपारी १२ वाजतापर्यंत सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यंत गंभीर स्वरूपातील या प्रकरणावर पुढे काय कार्यवाही होते, याकडे वाघळूद येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.