तपासणी आवश्यकच; पण फिजिकल डिस्टन्सिंग पाळणेही महत्त्वाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:49+5:302021-07-02T04:27:49+5:30
रिअॅलिटी चेक वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जाते, तर ...
रिअॅलिटी चेक
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जाते, तर दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. आरोग्य तपासणी आवश्यकच आहे; पण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणेही महत्त्वाचे आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी नियोजनामुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. तथापि, तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. गर्दी टाळा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. दुसरीकडे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातच व्यवस्थित नियोजन नसल्याचा प्रकार गत पाच दिवसात पाहणीदरम्यान दिसून आला. विविध आजारांच्या तपासणीसाठी रुग्ण व नातेवाईक येत आहेत. तपासणी आवश्यकच आहे. पण त्यासोबतच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणेही महत्त्वाचे ठरत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी होणार नाही, यासाठी विशेष व्यवस्था करणे आवश्यक ठरत आहे.
.....
कोट बॉक्स
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन करण्याबरोबर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. सरकारी रुग्णालयात गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम